आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पाेज: खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या जंगलात वृक्षकत्तलीचा उद्याेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- त्र्यंबकराेडवरील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या घनदाट जंगलातील शेकडाे वृक्षांची कत्तल करण्यात अाली अाहे. कत्तल झालेल्या वृक्षांमध्ये साग, अावळा यासारख्या माैल्यवान वृक्षांचा समावेश असल्याने या कृत्यामागे वृक्ष तस्करीचे माेठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. 


त्र्यंबक विद्यामंदिर परिसरातील खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या २६५ एकरावरील जंगलात अनेक माैल्यवान अाैषधी वृक्षांची लागवड करण्यात अाली अाहे. बेराेजगारांना उद्याेग व्यवसाय सुरू करण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. या परिसराची देखभाल करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात अाले अाहेत. अायाेगाच्या प्रशिक्षण केंद्रात जाणाऱ्या-येणाऱ्यांची प्रवेशद्वारावरच नाेंद करण्यात येते. असे असतानाही येथील जंगलातून ट्रकच्या ट्रक वृक्ष गायब हाेत असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. प्रशिक्षण केंद्रात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरदेखील माेठ्या वृक्षांची कत्तल करण्यात अाली अाहे. इतकेच नव्हे तर, कुणालाही काेणत्याही प्रकारची अडचण नसलेल्या प्रिन्सिपल बंगल्याच्या पाठीमागील वृक्षांवरही अारी चालविण्यात अाली अाहे. 


या प्रशिक्षण केंद्रात शेवगा, पेरू, अावळा यासारख्या वृक्षांची बाग फुलविण्यात अाली हाेती. त्या संदर्भाचा फलकदेखील झळकविण्यात अाला अाहे. मात्र, सद्यस्थितीत फक्त फलकच सुस्थितीत दिसत असून फळबागा नष्ट झाल्या अाहेत. राज्य सरकारने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी यावर्षीच एक काेटी वृक्षलागवडीचा संकल्प केला हाेता. त्या अनुषंगाने शाळांसह विविध शासकीय कार्यालयांना वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात अाले हाेते. केंद्र शासनाकडूनही वृक्षलागवडीसाठी माेठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जात अाहे. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी खादी ग्रामाेद्याेग अायाेगाच्या प्रशिक्षण केंद्रातील माेकळ्या जागेत वृक्षांची लागवड केली हाेती. याउलट, या जंगलातील सुमारे २० ते २५ वर्षे जुन्या वृक्षांवर लालसेपाेटी कुऱ्हाड चालविण्यात अाली अाहे. या तस्करीमध्ये माेठी साखळी असल्याचा संशय असून, या बाबीचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी वनविभागाला पार पाडावी लागणार अाहे. 

 

परवानगी दिली नाही, गुन्हे दाखल करणार 
खादीग्रामाेद्याेग अायाेगाच्या वतीने दहा दिवसांपूर्वी काही वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी अर्ज दिला हाेता. मात्र, अाम्ही त्यांना काेणत्याही स्वरूपाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करून विनापरवानगी वृक्षताेड केल्याप्रकरणी महाराष्ट्र झाडेताेड अधिनियम १९६४ च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. 
-प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी 


संबंधितांवर खुनासारखे गुन्हे दाखल व्हावेत 
एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी पाच-पाच काेटी रुपयांचा निधी देते. वृक्षांची लागवड करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापरही केला जाताे अन‌् दुसरीकडे शासकीय कार्यालयातच वृक्षांची कत्तल केली जाते. हे अतिशय चुकीचे असून हे कृत्य करणाऱ्यांवर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल व्हावेत.

-शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी 


सारवासारवीचे प्रयत्न 
याप्रकरणाची ‘दिव्य मराठी’ने वनविभागाच्या ‘खादी ग्रामाेद्याेग’च्या अधिकाऱ्यांकडे चाैकशी केली असता सारवासारव करण्यासाठी ‘खादी ग्रामाेद्याेग’च्या अधिकाऱ्यांकडून अाटाेकाट प्रयत्न करण्यात अाले. वनविभागाच्या दाेन कर्मचाऱ्यांनी बुधवारीच (दि. २७) खादी ग्रामाेद्याेगच्या कार्यालयात हजेरी लावून चाैकशी केली. 

बातम्या आणखी आहेत...