आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोळ्यात मिरचीची पूड फेकून 9 लाख लुटले, दोन महिन्यांत लुटीच्या तीन घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यापारी सानप यांच्या गाडीत फेकलेली मिरचीची पूड. - Divya Marathi
व्यापारी सानप यांच्या गाडीत फेकलेली मिरचीची पूड.

लासलगाव- येथील अॅक्सिस बँकेतून पैसे काढून कारमध्ये बसणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून नऊ लाख रुपये लुटून नेल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने लासलगाव शहरात खळबळ उडाली असून, गेल्या दोन महिन्यांत अशाप्रकारच्या तीन घटना घडल्याने व्यापारीवर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. विंचूर येथील सर्वज्ञ ट्रेडिंग कंपनीचे मालक राहुल शंकरराव सानप ॲक्सिस बँकेत सोमवारी दुपारी रक्कम काढण्यासाठी आले होते. त्यांच्या मालकीच्या स्विफ्टमध्ये (एम.एच. ०४ जीइ ८७९२) नऊ लाख रुपये ठेवून ते बसण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी गाडी पंक्चर असावी म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले असता मागावर असणाऱ्या हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सानप यांनी प्रतिकार करताच दुचाकीस्वारांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. बँकेच्या बाहेर असलेल्या ग्राहकांनी तातडीने धाव घेत सानप यांच्या तोंडावर पाणी टाकून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर लासलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास तातडीने व्हावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. 


दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा व्यापारीवर्गास लुटण्याचे प्रकार लासलगावमध्ये घडले असून अद्याप एकाही लुटीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे लासलगावच्या व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले अाहे. आशिया खंडातील नंबर एकची बाजार समिती असलेल्या लासलगावमधील व्यापारी किती सुरक्षित आहे, असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. 


बँक अधिकाऱ्यांची तातडीची बैठक
लासलगावला तीन-चार महिन्यांत बँकेच्या बाहेरच लुटमारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच बँकांच्या व्यवस्थापकांची तातडीची बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. 


सीसीटीव्ही यंत्रणा अकार्यक्षम
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व धान्याचे मोठ्या प्रमाणात लिलाव होत असतात. यामुळे शहरात अनेक राष्ट्रीयीकृत बँका आहेत. परंतु, बँकांतील व्यवहार किती सुरक्षित आहे असा प्रश्न चर्चिला जात आहे. व्यापाऱ्यांनी बँकेतून पैसे काढल्यावर पाळत ठेवून लुटमारीच्या तीन महिन्यांत चार-पाच घटना घडल्या आहेत. गाडीची काच फाेडून, गाडी पंक्चर असल्याचे भासवून तर डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटमारीचे प्रकार घडत अाहेत. बँकांचे सीसीटीव्ही कार्यान्वित नसल्याचे निष्पन्न झाले आहे. 


पाेलिसांची जबाबदारी वाढली
बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या शेतीमालाची रक्कम चेकने किंवा एनइएफटीद्वारे व्यापारीवर्ग करत होते. शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून काही व्यापारी रोखीने पेमेंट करतात. पेमेंट काढण्यासाठी गेल्यावर व्यापाऱ्यांना लुटमारीचा सामना करावा लागत अाहे. लुटमारीच्या घटनांचा तपास न लागल्याने पोलिसांची प्रतिमाही डागाळली आहे. मध्यंतरी शहरात मंगळसूत्र ओढण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेने आपले कौशल्य पणाला लावून तपास करण्याची वेळ अाली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...