आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई पालखीतील चौघांना कारने चिरडले, एक ठार, तिघे गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- सिन्नर-घोटी मार्गावर हरसुले फाट्याजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या इर्टिगा कारने टाकेद (ता. इगतपुरी) येथून निघालेल्या साई पालखीतील चौघा तरुणांना रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास चिरडले. कारच्या पुढच्या भागात अडकून एक तरुण १०० मीटर फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर साईभक्तांनी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करत घटनास्थळी उशिरा पोहचलेल्या पोलिसांप्रती रोष व्यक्त केला. आमदार राजाभाऊ वाजे, पाेलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली. 


शनिवारी दुपारी निघालेली पालखी सोनारी रस्त्याने हरसुले फाट्यावरून घोटी मार्गाने मार्गस्थ झाली. हरसुले फाट्याजवळ कार (एमएच ०४, जीयू ३११३)चालकाचे नियंत्रण सुटल्याने पायी चालणाऱ्या पालखीतील चौघांना कारने चिरडले. यात रोशन गणेश लगड (१८) हा गाडीच्या पुढच्या बाजूस अडकून सुमारे १०० मीटर अंतर फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुल राजाराम लगड (२०), पांडुरंग संपत काळे (२२), योगेश बाळू भुसे (२३) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश भुसे याच्या डोक्यास तर राहुल लगड आणि पांडुरंग काळे यांच्या पायांना गंभीर जखमा झाल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रोशनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी टाकेद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिन्नर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


आमदार वाजेंची यशस्वी मध्यस्थी
अपघातानंतरही पोलिस उशिरापर्यंत घटनास्थळी पाेहोचले नव्हते. याच सुमारास कारचा चालक फोनवरून अपघाताची माहिती देताना पालखीतील भाविकांनी पाहिले. त्यामुळे तो वरिष्ठ पातळीवरून सुत्रे हलवत असल्याने पोलिस घटनास्थळी मुद्दाम उशिरा येत असावे, असा संशय भाविकांना आला. त्यामुळे संताप अनावर झाल्याने त्यांनी हरसुले गावात रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, आमदार राजाभाऊ वाजे साडेसात वाजता हरसुले फाट्यावर पोहोचले. लोकप्रतिनिधी घटनास्थळी हजर झाले. मात्र, पोलिस येत नसल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर काही वेळाने पोलिस घटनास्थळी पोहोचले. आमदार वाजे आणि पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...