आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड-इगतपुरी लोहमार्गासाठी 1860 कोटी रुपयांची तरतूद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड- भुसावळ मनमाड शहरात रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या नवीन फूटओव्हर ब्रिजला प्रथमच सरकते जिने बसविण्यास केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महिला व ज्येष्ठांची सोय हाेईल. मनमाड रेल्वे विकासाच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. 


मनमाड-इगतपुरीदरम्यान हाेणाऱ्या तिसऱ्या लोहमार्गिकेमुळे मनमाड-नाशिक हे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता सुपरफास्ट गाड्या कापू शकणार आहे. याचा मालवाहतुकीस मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये मनमाड-इगतपुरी या १२४ किलाेमीटर अंतराच्या मार्गावर तिसरा लोहमार्ग उभारण्यात येणार अाहे. त्यासाठी १८६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जळगाव-मनमाडदरम्यान तिसऱ्या लोहमार्गिकेसाठी ५२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश असल्याची माहिती भुसावळ विभागाचे प्रबंधक राम यादव यांनी दिली. भुसावळ विभागात सध्या सुरू असलेल्या विविध कामांसाठी ४७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 


इगतपुरी-मनमाडदरम्यान तिसरा लोहमार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. विभागातील ५४ फाटकांच्या कार्यप्रणालीत सुधार करण्यासाठी ११.९२ कोटी, रेल्वे मार्गावरील १०८ पुलांची देखभाल, दुरुस्ती आणि पुनर्निर्माणासाठी ५७.१० कोटी, स्लिपर्स, रुळ बदलण्यासाठी ९१.५ कोटी, संकेत प्रणालित सुधार तसेच डिजिटल प्रणालीचा वापर वाढविण्यासाठी ९२.६५ कोटी, भुसावळ, मनमाड आणि नाशिकरोड कार्यशाळा दुरुस्तीसाठी १६.४१ कोटी, अकोला, मूर्तिजापूर, खंडवा, लकमापूर, बडनेरा, देवळाली, अमरावती, नवी अमरावती, शेगाव, नांदुरा, चांदूरबाजार, नागझरी, घोटी, बोदवड आणि भुसावळ या १६ स्थानकांवर पूल उभारणी, फलाट सुधारण्यासाठी ४५ कोटी आणि भुसावळ यार्डातील वाहतुकीत सुलभता यावी म्हणून ९.१ कोटी निधींची विभागणी करण्यात आली आहे. भुसावळ-भादलीदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे यादव यांनी सांगितले.भुसावळ-जळगावदरम्यानच्या चौथ्या मार्गासाठी ५२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 


अपंगांसाठी दाेन डबे 
भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेसला शयनयान श्रेणीचे दोन डबे जोडण्याविषयी मुख्यालयाने रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रवाशांनी १८२ क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन यादव यांनी केले.

 
सरकत्या जिन्याची संख्या वाढणार 
भुसावळ, नाशिक, मनमाड , जळगाव, बडनेरा, खंडवा येथे प्रत्येकी दोन असे १२ सरकत्या जिन्यांव्यतिरिक्त नवीन १४ सरकते जिने मंजूर झाले आहेत. भुसावळ, नाशिक, मनमाड स्थानकांव्यतिरिक्त विभागातील अन्य महत्त्वाच्या स्थानकांवर उतरण्यासाठी सरकते जिने बसविण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यामुळे विभागातील सरकत्या जिन्यांची संख्या २६ होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...