आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अासाराम अाश्रमाचे अतिक्रमण भुईसपाट; आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात विनापरवानगी वाढीव काम करणाऱ्या लाॅन्सचे अतिक्रमण काढण्यास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने साेमवारपासून (दि. २१) सुरुवात केली अाहे. या कारवाईअंतर्गत गंगापूरराेड परिसरात पूररेषेत असलेल्या अासाराम अाश्रमावर प्रचंड बंदाेबस्तात बुलडाेझर फिरविण्यात अाला. प्रारंभी अनुयायांनी महापालिकेच्या पथकाला विराेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर महापालिकेने अाश्रम जमीनदाेस्त केला. विशेष म्हणजे हे अतिक्रमण उद‌््ध्वस्त केल्यानंतर अनुयायांनी सायंकाळी दिवाणी न्यायालयाकडून स्थगिती अादेश मिळविल्याने २८ मेपर्यंत तेथील परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्यात अाली अाहे. दरम्यान, याचवेळी मते नर्सरी येथील ग्रीन फिल्ड लाॅन्सचे संपूर्ण स्टेज व लाॅन्सचे अतिक्रमणही काढण्यात अाले. 


पार्किंगचे नियम धाब्यावर बसवत तसेच विनापरवानगी उभारण्यात आलेल्या लाॅन्सविरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. अनधिकृत लॉन्सविरोधात माेहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गंगापूररोड परिसरातील लॉन्सवर हातोडा चालविण्यात आला. या मोहिमेत गंगापूररोडवरील पूररेषेत असलेला अासाराम आश्रम व ग्रीन फिल्ड लाॅन्सवर कारवाई करण्यात अाली. पालिकेची कारवाई टाळण्यासाठी काही लॉन्सचालकांनी स्वत:हून लॉन्सचे अतिक्रमण काढून घेतले. शहरातील बहुतांश लॉन्सचालकांनी महापालिकेची परवानगी न घेताच माेठ्या प्रमाणात वाढीव काम केले अाहे. 


या अनधिकृत वाढीव कामामुळे वाहतुकीला माेठा अडथळा निर्माण होत होता. याच पार्श्वभूमीवर परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या १६३ लॉन्सचालकांना महापालिकेने नोटिसा बजाविल्या होत्या. मात्र, त्यापैकी काही बोटावर मोजण्याइतकेच लॉन्सचालकांनी परवानगी घेतलेली हाेती. त्यामुळे अनधिकृत लॉन्सविरोधात पालिकेने सोमवारपासून मोहीम हाती घेतली अाहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशीच गंगापूररोडवरील अतिक्रमण पालिकेने प्रचंड फाैजफाट्यात जमीनदाेस्त केले. सकाळी १० वाजेपासून मनपा अायुक्त तुकाराम मुंढे व अतिरिक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त राेहिदास बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे सातपूरच्या विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगर नियाेजन विभागाचे सहायक संचालक अाकाश बागूल, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, अतिक्रमण अधीक्षक एम. डी. पगारे यांच्यासह सहाही विभागांच्या विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहीम राबविण्यात अाली. 


अासाराम अाश्रमाचे बांधकाम व शेड उद‌्ध्वस्त करताना त्यांच्या अनुयायांनी विराेध करण्याचा अयशस्वी प्रयत्न करून बघितला. मात्र, पालिकेच्या पथकाने त्यांना दाद दिली नाही. यापुढेही अनधिकृत लॉन्सविरोधात मोहीम सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी स्पष्ट केले. 


कलाकारांचे हक्काचे व्यासपीठच नष्ट 
गंगापूररोडवरील विश्वास लॉन्स हे या परिसरातील एक सांस्कृतिक, सामाजिक केंद्रच बनले होते. या ठिकाणी वर्षभरात माजी विद्यार्थ्याचे मेळावे, संगीताच्या मैफली, सांस्कृतिक कार्यक्रम असे वर्षभरात ८० ते ९० कार्यक्रम मोफत आयोजित केले जात होते. मात्र, महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्याने त्याचा फटका याही लॉन्सला बसला आहे. या प्रकारामुळे हक्काचे व्यासपीठ हरवल्याच्या भावना स्थानिक कलाकारांकडून व्यक्त होत आहेत. 


आश्रमाचे अतिक्रमण काढताना भाविकांची गर्दी 
आसाराम आश्रमाचे पूररेषेतील बांधकाम महापालिकेच्या पथकाने ताेडण्यास सुरुवात करताच अासारामच्या अनुयायांनी गर्दी करून विराेध केला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी हस्तक्षेप केल्याने सायंकाळपर्यंत आश्रमाचे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले हाेते. 


ही बांधकामे ताेडली 
पूररेषेतील ६० बाय २० मीटरचे शेड, १५ बाय १० चे वीट बांधकाम, ५ बाय ७ चे शेड, १० बाय ४ चे शेड, १० बाय १० चे शेड, १५ बाय ३ चे शेड, ५ बाय ५ च्या पक्क्या खाेल्या, २५ बाय ३ च्या अारसीसी खाेल्या, २ बाय २ च्या खाेल्या. 


अशी हाेती यंत्रणा 
- ०४ पथके अतिक्रमण विभागाची 
- ०३ जेसीबी 
- दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन पाेलिस बंदाेबस्त 

बातम्या आणखी आहेत...