आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा, विधानसभेची गणिते बदलणार; निवडणुकीनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानपरिषद निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने चक्क विराेधी काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीच्या उमेदवाराला जाहीरपणे पाठिंबा दिल्याने त्याचे दूरगामी परिणाम अागामी निवडणुकांवर हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. अाजवर शिवसेनेबराेबर युती करून अापले राजकीय रंग उधळणाऱ्या भाजपने सेनेची साथ सुटल्यानंतर अाता राष्ट्रवादीला नवा मित्र केल्याचे स्पष्ट झाले अाहे. त्यामुळे या दाेन्ही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेली मंडळी कमालीची अस्वस्थ झाली अाहे. त्यात विशेषत: भाजपमधून राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांचा समावेश अाहे. दुसरीकडे काँग्रेसचे पदाधिकारीही भाजपच्या भूमिकेमुळे बुचकळ्यात पडले अाहेत. 


गेल्या २३ वर्षांपासून एकमेकांचे बाेट धरून राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकारण करणाऱ्या शिवसेना अाणि भाजपमधील भांडणे गेल्या दाेन वर्षांत विकाेपाला गेली अाहेत. अशी परिस्थिती यापूर्वी वारंवार अाली असली तरीही या पक्षांनी तिसरा सवंगडी शाेधण्याचा प्रयत्न फारसा केलेला दिसत नाही. गेली विधानसभा निवडणूक शिवसेना अाणि भाजपने स्वतंत्रपणे लढविली हाेती. सत्तेसाठी हे दाेन्ही पक्ष एकत्र अाले असले तरीही भाजपच्या निर्णयांविराेधात सेना वारंवार रस्त्यावर उतरली अाहे. त्यामुळे या दाेन्ही पक्षांत वितुष्ट निर्माण झाले. पालघर येथील लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत भाजपने दिवंगत चिंतामण वनगा यांच्या सुपुत्रास उमेदवारी न देता काँग्रेसचे डाॅ. राजेंद्र गावित यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. ही राजकीय संधी साधून सेनेने श्रीनिवास वनगा यांना तिकीट देऊन भाजपवर कडी केली. याचे पडसाद थेट विधानपरिषद निवडणुकीवर उमटले. विशेषत: नाशिकमध्ये भाजपने उमेदवार दिलेला नसल्यामुळे प्रारंभी सेनेच्या उमेदवाराला या पक्षाचा पाठिंबा असेल असा अंदाज लावला जात हाेता. मात्र, युतीची शक्यता सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावली. यापुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीस जिल्हा प्रशासनानेदेेखील प्रारंभ केला असून, मतदार याद्या अद्ययावत करणे अाणि त्याबराेबरच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांचा थेट मतदार यादीत समावेश करणे या माेहिमांमुळे या नवमतदारांपर्यंत पाेेहाेचण्याचे अाव्हान इच्छुकांसमाेर अाहे. 


पालघरमधील घडामाेडींचे परिणाम, जागांबाबत अनिश्चितता 
पालघरच्या जागेवरून सेना-भाजपमध्ये बराच काळ खल सुरू हाेता. सेनेने अापला उमेदवार मागे घेतल्यास नाशिक विधानपरिषदेत सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, अशी भूमिका भाजपने घेतली. मात्र, त्यास सेना तयार न झाल्याने एेन निवडणुकीच्या एक दिवस अाधी रात्रीच्या वेळी भाजपने अाघाडीचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांना ताेंडी पाठिंबा दर्शविला. तशा सूचनाही तालुकानिहाय बैठका घेऊन विभागीय संघटनमंत्र्यांनी मतदारांना दिल्या. त्यामुळे अागामी निवडणुकांमध्ये भाजपने युतीसाठी राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. या अनाेख्या मैत्रीचा परिणाम विधानसभेच्या अागामी निवडणुकांवरही हाेण्याची शक्यता अाहे. या निवडणुकांसाठी इच्छुकांनी अातापासूनच माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. परंतु, भाजप अाणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढविली तर काेणत्या जागा काेणाला मिळतात हे निवडणुकीपर्यंत अनिश्चित असेल. परिणामत: संबंधित इच्छुकांना माेर्चेबांधणीस अडचणी येतील. 


दलबदलूंची झाली पंचाईत 
अाज भाजपमधील काही मंडळी तिकीट न मिळाल्यास राष्ट्रवादीतही जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अाहे. मात्र, भाजप-राष्ट्रवादी युती झाल्यास अशा 'दलबदलूं'ना वेगळ्या पक्षाचा मार्ग चाेखाळावा लागण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या भरवशावर असलेले काँग्रेसचे इच्छुकही या नव्या समीकरणामुळे संभ्रमित झाले अाहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष अागामी काळातील राजकीय घडामाेडींकडे लागले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...