आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉप्या पकडण्यास गेलेले भरारी पथकच निघाले बोगस;दहावीच्या परीक्षेदरम्यान नाशकातील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दहावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी शिक्षण विभागाने चांगलीच कंबर कसलेली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधील  शाळेत कॉपी पकडण्यासाठी आलेले भरारी पथकच बोगस निघाल्याचे उघडकीस आले. नाशिक रोड येथील नारायणबापूनगर परिसरातील अभिनव आदर्श शाळेतील ही घटना आहे. केंद्र संचालकांना कॉपीमुक्त अभियानातील भरारी पथक असल्याचे सांगून दोन युवकांनी शाळेबाहेर विद्यार्थ्यांची तपासणी सुरू केली. मात्र, याच वेळी नातवाला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्याला या युवकांच्या हालचाली संशयास्पद वाटला. त्यांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता,  आम्ही या शाळेत कोणतेही भरारी पथक पाठवले नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. बोगस भरारी पथकाचा चेहरा उघडा पडला. मात्र, दोन्ही युवकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या ठिकाणावरून धूम ठोकली.   


कॉपी तपासणीच्या बहाण्यातून मुलांचे मोबाइल आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने बोगस भरारी पथक तयार झाल्याची चर्चा आहे. गुरुवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. पहिलाच पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. परीक्षा सुरू होण्यासाठी पाऊण ते एक तास उशीर असतानाच  २८ ते ३० वयोगटातील दोन युवक शाळेत आले. या दोन्ही युवकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला भालके  आणि  केंद्र संचालिका जयश्री ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही बोर्डाच्या भरारी पथकाचे सदस्य असून सोबत आणलेले बोर्डाची झेरॉक्स कागदपत्रे, खोटे ओळखपत्र दाखवले. तसेच त्यांचा विश्वास निर्माण व्हावा म्हणून भ्रमणध्वनी क्रमांकही दिला. त्यामुळे केंद्र संचालिका व मुख्याध्यापिकेने दोघांवर विश्वास ठेवला. दोघांनी कॉपीमुक्त  अभियानासाठी  शाळेत आलो असून  शिक्षकांसोबत बोलायचे आहे. परंतु तोपर्यंत शिक्षक आलेले नव्हते. याचा फायदा घेऊन दोघांनीही शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पाहून काही ज्येष्ठ नागरिकांना संशय आला. त्यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आणि एसएससी बोर्डाचे अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक मोबाइलवरून मिळवून  हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. अधिकाऱ्यांनी या शाळेत पथक पाठवले नसल्याचे सांगितल्यावर उपस्थित नागरिक  आश्चर्यचकित झाले. त्यांनी पुढील हालचाल करण्याआधीच ते दोघे फरार झाले. केंद्र संचालिका ठाकरे यांनी युवकांच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र  प्रतिसाद मिळाला नाही.  


बोगस पथक की रॅकेट?   
दहावी व बारावीच्या परीक्षेत डमी विद्यार्थी बसण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु, भरारी पथकच बोगस असल्याची घटना प्रथमच समोर आली आहे. बोर्डाचे ओळखपत्र तयार करून भरारी पथक असल्याचे भासवून परीक्षा केंद्रांना भेट देण्यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे. तसेच या पथकामुळे डमी विद्यार्थी तसेच कॉपी सारखे गैरप्रकारही वाढण्याची शक्यताही असते. यात काही विद्यार्थ्यांचाही या भरारी पथकाशी संबंध आहे का, याचाही शोध घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई केली तरच परीक्षेतील सुरक्षितता टिकून राहील. तसेच अशा घटनांना पायबंद बसेल.

 

पोलिसांत दिली तक्रार
बोगस भरारी पथकाबाबत शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना या प्रकाराबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास हे पोलिस करतील. मात्र आता केंद्र संचालक व शिक्षकांना दक्ष राहून काळजी व लक्ष ठेवण्याची गरज आहे. 
- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक   

 

असे असते भरारी पथक   
शिक्षण मंडळातर्फे २७ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकांना बोर्डातर्फे ओळखपत्र दिले जाते. अध्यक्ष, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक व शिक्षकांचा सहभाग पथकांमध्ये असतो. दोन पुरुष व दोन महिला शिक्षकांचा समावेश असतो. 

बातम्या आणखी आहेत...