आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाइल्डलाइनने राेखला बालविवाह; मुलीच्या शिक्षणाचीही घेतली जबाबदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अजाण वयात मुलीला लग्नाच्या बाेहल्यावर उभे करण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न नवजीवन चाइल्डलाइन संस्थेने शुक्रवारी (दि. ९) उधळून लावला. त्र्यंबकेश्वरजवळील एका अादिवासी कुटुंबातील मुलीचा शुक्रवारी हाेणारा विवाह संस्थेने दाेन्ही बाजूच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून पाेलिसांच्या मदतीने अखेर रद्द केला. महत्त्वाचे म्हणजे चाइल्डलाइनने केवळ विवाह रद्द न करता मुलीला पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर तिच्या शिक्षणाची अाणि राहण्याची व्यवस्था करण्याचीही जबाबदारी घेतली. 


मुलीचे वय अवघे साेळा वर्षाचे. अार्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिची जबाबदारी फार काळ पेलवणार नाही अशा भावनेने मुलीच्या पित्याने वर संशाेधन सुरू केले हाेते. याचकाळात एका अन्य जातीच्या परंतु अार्थिक परिस्थिती चांगली असलेल्या मुलाचे स्थळ चालून अाले. कुटुंबीयांनी कसलाही विचार न करता विवाह ठरवून टाकला. त्र्यंबकेश्वर येथील एका धर्मशाळेत शुक्रवारी दुपारी हा विवाह हाेणार हाेता. त्याची माहिती चाइल्डलाइनच्या स्वयंसेवकांना समजताच त्यांनी मुलीच्या घरी धाव घेतली. 

प्रारंभी मुलीचे वय लपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र स्वयंसेवकांनी मुलीच्या शाळेत जाऊन तिचा दाखला मिळविला. त्यावरून तिचे वय साेळाच्या अासपास असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या घरच्यांना याविषयी समज दिल्यानंतर मुलाच्या पित्यालाही त्र्यंबकेश्वर पाेलिसांत बाेलावून घेण्यात अाले. तेथे कायदेविषयक माहिती देऊन हा विवाह झाल्यास संपूर्ण कुटुंबावरच बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल हाेईल अशी समज यावेळी देण्यात अाली. 


अखेर दाेघांच्याही कुटुंबीयांनी हा विवाह रद्द केल्याचे जाहीर केले. यंदाच्या लग्नाच्या माेसमातील बालविवाह राेखण्याची ही पहिलीच घटना अाहे. मुलीच्या घरची अार्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने तिचा अल्पवयात विवाह करण्याचा प्रयत्न सुरू हाेता. नवजीवन चाइल्डलाइनने विवाहापूर्वीच ताे राेखल्याने मुलीच्या भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत मुलीच्या शिक्षणाची अाणि तिच्या राहण्याची व्यवस्था चाइल्डलाइनकडून करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुलीच्या घरच्यांना देण्यात अाली अाहे. मुलीच्या घरचे यासाठी राजी झाल्यास तिचा शिक्षणाचा पुढील मार्ग माेकळा हाेणार अाहे. 


बालविवाहाची कळवा माहिती 
बालविवाह प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून कुणी विवाह केल्याचे समजल्यास सज्ञान वरावर तसेच मुला-मुलीचे अाईवडील, विवाह लावणारे यांवर गुन्हा दाखल करण्यात येताे. लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांनाही पाेलिस समज देतात. अशाप्रकारे काेठे बालविवाह हाेत असल्यास चाइल्डलाइन संस्थेच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. माहिती देणाऱ्याचे नाव गाेपनीय ठेवण्यात येते. 

बातम्या आणखी आहेत...