आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा घरफोड्यांच्या गुन्ह्यात \'दिल्ली गँग\' बडोद्यातून जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात दिवसा घरफोड्या करणाऱ्या दिल्ली गँगचा गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने पर्दाफाश केला. बडोद्यात एका हॉटेलमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवत पथकाने ही धडक कारवाई केली. पाच संशयितांना पथकाने अटक केली. टोळीकडून अकरा घरफोड्यांतील ४५० ग्रॅम सोने, १० लाखांची रोकड असा २५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तब्बल तीन महिन्यांपासून पथक या टोळीच्या मागावर होते. 


याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गाझियाबाद (मेरठ) या परिसरातील गुन्हेगार अशाप्रकारे घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याच टोळीतील काही संशयित महाराष्ट्रत येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या दोन पथकाने सुरत, अहमदाबाद, बडोदा परिसरात तपासणी केली. एका हॉटेलमध्ये शकील ऊर्फ मुल्ला इस्माइल कुरेशी (६२ रा. मुरादाबाद, यूपी), इर्शाद सिंधू कुरेशी (रा. गाझियाबाद), इशरत अली इज्जत (रा. दिल्ली), मोहम्मद शमशाद निजाम (मुरादाबाद) यांना हॉटेलमध्ये अटक केली. रवींद्र बागूल, दीपक जाठर, विशाल देवरे, विशाल काठे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरात २०१७ आणि जानेवारी २०१८ या कालावधीत दिवसा घरफोडीचे गुन्हे घडले होते. घरफोडी करणारी अांतरराज्यातील गँग असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या अनुषंगाने पथकाला तपासाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पथक तीन महिन्यांपासून टोळीच्या मागावर होते. पथकाचे उपआयुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी अभिनंदन केले. 


मोबाइल वापर नाही
संशयित टोळी घरफोडी करण्यापूर्वीच तीस ते चाळीस किमी अंतरावर थांबून एकमेकांशी बोलण्यासाठी मोबाइलचा वापर करत. घरफोडी झाल्यानंतर वापरलेला मोबाइल फेकून देत. यामुळे संशयिताचे लोकेशन मिळवणे पोलिसांना अवघड होते. 


चारशे ते पाचशे मोबाइल तपासणी
पथकाने दोन महिन्यांत चारशे ते पाचशे मोबाइलची तंत्रविश्लेषन शाखेच्या मदतीने तपासणी केली. एक-दोन नंबरचे लोकेशन बदलत असल्याचे निदर्शनास आले. अखेर एका मोबाइलमध्ये बडोद्याच्या हॉटेलचा नंबर मिळाला. या एका धाग्यावरून पथकाने ही टोळीच जेरबंद केली.

 
नाशिक पोलिसांपुढे लोटांगण
पथकाने बडोद्यात टोळीला जेरबंद केल्यानंतर चौकशी केल्यानंतर टोळीला वाटले मुंबई पोलिस आहेत. नाशिक पोलिस येतील याची सूतराम शक्यताही टोळीला नसल्याने त्यांनी पथकापुढे लोटांगण घातले. चौकशीत पंचवटी ३, उपनगर ३, मुंबईनाका २, गंगापूर १, भद्रकाली १ आडगाव १ असे ११ गुन्हे केल्याची कबुली दिली. याचप्रकारे धुळे, पिंपळगाव, ठाणे, मुंबई, गुजरात राज्यातील शहरात अशाच प्रकारे घरफोडी केल्याचे चौकशीत सांगितले. 


मतभेदातून अनेक टोळ्या
या टोळीचा फादर शकील याने घरफोडी करण्यासाठी सराईत गुन्हेगारांची मोट बांधली. वाटाघाटीतून मतभेद झाल्यानंतर याच टोळीतील फुटिरांनी दुसऱ्या टोळी निर्माण केल्या आहेत. अशाप्रकारे ५ ते ६ टोळ्या कार्यरत असल्याची माहिती संशयितांनी पोलिसांनी दिली. 


महामार्गालगत शहर रडारवर 
संशयित गँग दिल्ली येथे एकत्र होती. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असा प्रवास करत शहरापासून ३० ते ४० किमी अंतरावर तारांकित हॉटेलमध्ये थांबत येथून कारने ते शहरात येऊन घरफोडी करून मुंबई, गुजरात, राजस्थानमार्गे दिल्लीला पळून जात. यामुळे संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले तरी पकडले जाण्याची शक्यता नसल्याने ते वेगवेगळ्या शहरांत घरफोडी करत होते. 


सकाळीच घरफोडी 
टोळी सकाळी ९ ते १२ याच वेळात घरफोडी करत होती. कुठल्याही अपार्टमेंट अथवा बंगल्यास कुलूप असले अथवा सेफ्टी डोअर बंद असल्यास बेल वाजवून घरात कोणी आहे का नाही याची खात्री करून अवघ्या दाेन मिनिटात कडी-कुलूप तोडून घरफोडी करून कारमधून फरार होत. 


सुटबुटात येऊन घरफोडी 
टोळी कारने सुटबुटात येऊन परिसरात फिरून बंद असलेल्या घरांमध्ये घरफोडी करत होती. या टोळीचा फादर शकील ऊर्फ मुल्ला हा कारमध्ये बसून परिसरात पाळत ठेवायचा, इर्शाद आणि इशरत दोघे घरफोडी केल्यानंतर शांतपणे पायी अथवा रिक्षातून कार उभी केलेल्या ठिकाणी जाऊन तेथून शिर्डी, औरंगाबाद, मुंबईमार्गे गुजरात, राजस्थानमार्गे दिल्लीला पळून जात. 


फरार संशयिताकडून आणखी गुन्हे 
टोळीतील फरार संशयित पकडला गेल्यानंतर अशाप्रकारे घरफोडी करणाऱ्या टोळ्या निष्पन्न होणार आहेत. तीन महिन्यांपासून टोळीचा माग सुरू होता. तंत्रविश्लेषन शाखेच्या मदतीने माग काढणे सोयीचे झाले. बोगस पत्ते असल्याने तपासात अडचणी आल्या. पथकातील कर्मचाऱ्यांनी हताश न होता शोध सुुरूच ठेवला. 
- आनंदा वाघ, वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १ 

बातम्या आणखी आहेत...