आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतिमूल्ये पाळली जात नसल्याने डॉक्टरांवरील विश्वास उडतोय: डॉ. अभय बंग यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘व्यावसायिक नीतिमूल्ये पाळली जात नसल्याने ९३ टक्के लोकांचा डॉक्टरांवर विश्वास कमी झाला आहे. वैद्यकीय व्यवसायासाठी ही अतिशय गंभीर बाब अाहे. डॉक्टरांकडून रोग निर्मूलनाऐवजी कट प्रॅक्टिस आणि महागड्या उपचारांमुळे सर्वसामान्य लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले जात आहेत. एकीकडे मर्यादित शासकीय आरोग्य सेवा निष्पभ्र ठरू लागल्या असून दुसरीकडे खासगी उपचार प्रचंड महागडे होत आहेत. त्यामुळे खासगी व सरकारी डॉक्टरांना एकत्र आणून समाजहितासाठी वैद्यकीय व्यवसाय व नीतिमूल्ये ठरवून देण्याची गरज अाहे,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.   


सार्वजनिक वाचनालयातर्फे माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना रविवारी कार्यक्षम आमदार पुरस्कार देऊन गाैरवण्यात अाले. या वेळी डॉ. बंग बोलत होते. ५० हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप अाहे. या वेळी डॉ. बंग म्हणाले की, ‘या पुरस्काराला वेगळी उंची आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. जनता चारित्र्य बघत असते. महाजन यांनी आदर्श जीवनशैली स्वीकारली असल्याने त्यांच्या या निरोगी जीवनशैलीचा प्रत्येकाने अवलंब करावा,’ असे आवाहन या वेळी त्यांनी केले.  


कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कार्यक्रमात गोंधळ   
पुरस्कार वितरण समारंभात आरोग्य विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. गिरीश महाजन यांची मुलाखत सुरू असताना आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. १० ते १२ वर्षे काम करूनही ९ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयानुसार समान कामाला समान वेतन दिले जात नाही. विद्यापीठातील ३५० कंत्राटी कर्मचारी ८३ दिवसांपासून आंदोलन करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात व्यत्यय येत असल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी हा प्रश्न सोडवायचा असल्यास बाहेर भेटू, त्यासाठी ही जागा नाही, असे ठणकावले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वाचनालयाबाहेर निदर्शने केली.


चांगली कामे केली तर सन्मान मिळतो  
‘या पुरस्कारामुळे भविष्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजून प्रेरणा मिळेल. वैद्यकीय शिक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले अाहेत.  जनतेचे सेवक म्हणून चांगली कामे करत राहिलो तर लोकांकडूनच सन्मान मिळतो.  पोलिसांनी सलामी देणे-घेणे याच्यातूनच सन्मान मिळत नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.


एमसीआय जणू डाॅक्टरांची खाप पंचायत   
वैद्यकीय शिक्षणात मोठा भ्रष्टाचार होतो. मेडिकल काैन्सिल ऑफ इंडियाचे वैद्यकीय क्षेत्रावर योग्य नियंत्रण राहिले नसल्याने ही संस्था जणू डॉक्टरांवरील ‘खाप पंचायत’च झाल्याचेही डॉ. बंग यांनी सांगितले. एमसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी अनेक चुकीच्या गाेष्टी करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचे डाॅ. बंग म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...