आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिन्नर- दूध पावडरच्या निर्यातीवर शासनाने लादलेले निर्बंध आणि दूध उत्पादनात झालेल्या वाढीमुळे गेल्या महिनाभरात दूध दरात लिटरमागे पाच रुपयांची घसरण झाली आहे. टंचाईच्या काळातही महागड्या दराने चारा विकत घेऊन दुधाचा जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परिणामी दूध उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
दूध व्यवसायात चांगले दिवस येत असल्याचे दिसत असतानाच अचानक लिटरमागे पाच रुपयांनी दर घसरल्याने दूध धंदा शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. केंद्र शासनाने दूध पावडरच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहे. परिणामी दूध संकलन केंद्राने पावडर निर्मिती कारखानदारांनी दूध खरेदी कमी केल्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या दर्जेदार दुधास २७ रुपये भाव मिळत होता. कधी नव्हे इतका समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत दूध व्यवसायास प्राधान्य दिले होते. परिणामी तालुक्यात दूध संकलनही मोठ्या प्रमाणात वाढून ते दाेन लाखांपर्यंत पोहोचले आहे.
तथापि, दर घसरणीमुळे दर्जेदार दुधाचा दर पाच रुपयांनी कमी झाला अाहे. उत्पादकांच्या हाती अवघे २१ ते २२ रुपये पडत आहे. तालुका विभागीय सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून २२ रुपयांपर्यंत दर स्थिर ठेवला आहे. खासगी डेअरीमध्ये शेतकऱ्यांच्या हातात प्रति लिटर २० रुपये किंवा त्यापेक्षा कमी दर दिला जात असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तालुक्यात तालुका विभागीय दूध संघ, प्रभात डेअरी, नाशिक जिल्हा दूध संघ, डायनामिक्स, वारणा, थाेरात आदींसह अन्य खासगी डेअरीच्या माध्यमातून दाेन लाख लिटरहून अधिक दुधाचे संकलन होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध धंद्यास पसंती दिली. दुधाच्या दरातील घसरण न थांबल्यास अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पावडरवरील निर्बंध हटविण्याची गरज
दूध पावडर निर्यातीवर शासनाने लादलेले निर्बंध दूध धंद्यास मारक ठरत आहे. त्यामुळे दरात प्रतिलिटर पाच रुपयांची घसरण झाली आहे. निर्बंध न हटविल्यास आणखी दर घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अवस्थेतही २२ रुपये प्रतिलिटर दराने शेतकऱ्यांना पैसा देण्यास संघाचा प्रयत्न आहे. शासनाने पावडरवरील निर्यातबंदी उठवून उत्पादकांना दिलासा द्यावा.
- प्रदीप पाटील, व्यवस्थापक, सिन्नर विभागीय दूध संघ
चाऱ्याचे पैसे फिटणेही अवघड
टंचाईच्या काळातही महागड्या दराने चाऱ्याची खरेदी करून त्याचा साठा करून ठेवला आहे. दुधाच्या दरात घसरण झाल्याने केलेेले आर्थिक नियोजन ढासळले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला अाहे. चाऱ्याचे पैसे फिटणेही अवघड झाले आहे. - किरण सरोदे, दूध उत्पादक
दूध संकलन असे
२ लाख लिटर : तालुक्यात प्रतिदिन दूध संकलन
२७ रुपये : महिनाभरापूर्वी मिळणारा जास्तीत दर
२४ रुपये : महिनाभरापूर्वी मिळणारा सरासरी दर
१९ ते २० रुपये : सध्या मिळणारा सरासरी दर
जनावरांच्या चाऱ्याचे गणित
१५ किलो : एका गायीस प्रतिदिन लागणारा चारा
४० रुपये : इतर खाद्य
१४० रुपये : एकूण चाऱ्याचा खर्च
१० लिटर : सरासरी मिळणारे दूध
२४० रुपये : प्रतिदिन मिळणारा मोबदला
१०० रुपये : प्रतिदिन शिल्लक रक्कम
१९ ते २० रुपये : सरासरी मिळणारा नवीन दर
५० रुपये : प्रतिदिन शिल्लक राहणारी रक्कम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.