आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळक्याची तरुणांना बेदम मारहाण, दहशतीविरोधात नगरसूलला बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- नगरसूल येथे एका टोळक्याने गावात धुडगूस घालत दोन तरुणांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ येथील व्यापारी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले. संशयितांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत माघार घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 


शुक्रवारी (दि. ८) नगरसूल येथील आठवडे बाजारचा दिवस असल्याने याकरिता नगरसूल, खिर्डीसाठे, लहित, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, कोळगाव, मातुलठाण, राजापूर, पन्हाळसाठे, पिपळखुंटे, हडप सावरगाव, कुसमाडी, धामोडे आदी गावांतून हजारो नागरिक येथे येतात. सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान गावात कामानिमित्ताने आलेले राहुल कमोदकर प्रवीण निकम यांना मोबाइल वाहनाची कुरापत काढून येथील तरुण बंटी वानखेडे, भागीनाथ मोरे, योगेश नागरे यांनी लाठी, सळई, लाथाबुक्क्यांनी ग्रामस्थांसमोर मारहाण करत गावात दहशत निर्माण केली. या घटनेचे पडसाद शनिवारी सकाळी गावात उमटले. ग्रामपंचायतीसमोर हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ सकाळी नऊ वाजता जमा झाले. टोळक्याच्या निषेधार्थ येथील व्यापारी, दुकानदार ग्रामस्थांनी शनिवारी गाव बंद ठेवले होते. बंदची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, डी. ए. पाटील यांनी गावात येऊन मध्यस्थी केली, परंतु ग्रामस्थ व्यापाऱ्यांनी पोलिसी मध्यस्थीला साथ देताच संशयितांना अटक झाल्याशिवाय गावातील व्यवहार सुरू होणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक खैरनार पाटील यांना ग्रामस्थांनी गाव बंदचे निवेदन दिले. 


निवेदनावर सरपंच प्रसाद पाटील, पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश जाधव, राजू मुंगसे, साहेबराव कमोदकर, जगदीश पैठणकर, संभाजी बोरसे, रवी आहेर, रवी घोरपडे, राजेंद्र खैरनार यांच्यासह असंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत. राहुल कमोदकर यांच्या फिर्यादीवरून संशयित बंटी भगवान वानखेडे, भागीनाथ मोरे, योगेश नागरे यांच्याविरोधात येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. दरम्यान हे तिघे संशयित फरार आहेत. 


गावात दहशतीचे वातावरण 
सदरघटनेने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या काही महिन्यांपासून गावात गुंडांची दहशत वाढली अाहे. पोलिसांनी या गावगुंडांच्या मुसक्या त्वरित आवळाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...