आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमातून मारहाण; विधी महाविद्यालयाच्या आवारातच घडला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एकतर्फी प्रेमातून अनेक गंभीर प्रकार घडत अाहेत. असाच एक प्रकार शहरातील एका  महाविद्यालयाच्या आवारात घडला. वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीला एकतर्फी प्रेमातून युवकाने तिच्या मित्र-मैत्रिणींसमाेर अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. २२) गंगापूररोडवरील एका विधी महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये उघडकीस आला. 


पीडित युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्र्यंबकेश्वर येथील ही युवती गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात विधी शाखेत शिक्षणासाठी येते. गुरुवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाच्या अावारात ती आणि तिचे मित्र-मैत्रिणी गप्पा मारत उभे असताना त्र्यंबकेश्वर परिसरात शेजारी राहणारा संशयित राहुल किसन मेढे ऊर्फ पाटील लाल पल्सरवरून आला. दुचाकी बाजूला उभी करून त्याने या युवतीच्या गालावर चापट मारली व नाकाजवळ हाताने मारहाण केली.तसेच हात पकडून शिवीगाळ केली. 'तू माझ्याशी बोलत का नाही' अशी धमकी दिली. घडलेल्या प्रकाराने पीडितेसह तिच्या मैत्रीणींमध्ये दहशत पसरली. पीडित युवतीने तत्काळ जवळच असलेल्या सरकारवाडा पोलिसात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य अाेळखत पथकाने महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये शोध घेतला मात्र संशयित तेथे मिळाला नाही. संशयिताच्या विरोधात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक सारिका आहिरराव तपास करत आहेत. 


मुलींमध्ये दहशत
या प्रकाराने मुलींमध्ये दहशत पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच महाविद्यालयीन मुलीस चाकूचा धाक दाखवत 'प्रेमाला हो म्हण, नाही तर तुझ्या कुटुंबीयांना ठार करेन' अशी धमकी दिली होती. काही महिन्यांपूर्वी शालेय बस अडवत मुलीच्या तोंडावर पाणी फेकत 'प्रेमाला हो म्हण, आता पाणी फेकले, पुढच्यावेळी अॅसिड फेकेन' अशी धमकी दिली होती. अंबड परिसरात शालेय मुलीस तिघांनी उचलून नेत सामूहिक बलात्कार करण्याची धमकी दिली होती. या सर्व प्रकारामुळे मुलींमध्ये दहशत पसरली आहे. 


पोलिसांची गस्त कुचकामी
निर्भया, मर्दानी पथक आणि स्थानिक पोलिसांचे गस्त वाहन शोधूनही सापडत नसल्याच्या तक्रारी महाविद्यालयीन तरुणींनी केल्या आहेत. बीट मार्शलची गस्त केवळ परजिल्हा, परराज्यातील वाहन अडवण्यात खर्ची होत असल्याने गस्त कुचकामी ठरत आहे. 


शाळा-महाविद्यालयांत टवाळखोरांचा वावर 
शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा वावर वाढला आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर वरिष्ठांकडून तात्पुरते गस्त पथक पाठवले जाते. नियमित गस्त होत नसल्याने परिसरात टवाळखोरांचा वावर वाढला आहे. 


संशयितांच्या मागावर 
संशयित तरुण हा पीडितेच्या ओळखीचा आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने मारहाण केली. त्याच्या वाहनाचा नंबर आणि घरचा पत्ता मिळाला आहे. लवकरच त्यास अटक केली जाईल. 
- सारिका अहिरराव, सहायक निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...