आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांकडून आयुक्त मुंढेंना सबुरीचा सल्ला; चर्चा झाल्याचा अायुक्तांकडून इन्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर असूनही कोणतेही ठोस काम न झाल्यामुळे धोक्यात आलेले 'दत्तक नाशिक' वाचवण्यासाठी सत्ताधारी भाजपने आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्त केल्यानंतर त्यांच्या कामकाजाचा सर्वाधिक तडाखा भाजपलाच बसू लागला आहे. त्यामुळे अस्वस्थ पदाधिकाऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयात बैठकीनिमित्त आलेल्या मुंढे यांच्याशी औपचारिक चर्चेदरम्यान घरपट्टीमधील ३३ टक्के वाढीत दिलासा देण्यासह नगरसेवकांची कामे कशी मार्गी लागतील याबाबत सबुरीने घ्यावे, असे आवाहन केल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ भेट झाली, मात्र कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगत कथित अफवांना पूर्णविराम दिला. 


महापालिकेमध्ये फेब्रुवारी २०१७ मध्ये स्पष्ट बहुमताने सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, केंद्र व राज्यात सत्तेत असूनही भाजपला महापालिका क्षेत्रात एकही ठळक काम करता आलेले नाही. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत नाशिक शहर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असल्यामुळे भाजपची जबाबदारी अधिकच आहे. मात्र, त्याची पुरेशी जाण नसल्यामुळे किंबहुना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मतभेदात पक्षाची बदनामी आधीच झाल्यामुळे आयुक्तपदी शिस्तप्रिय अशा मुंढे यांना मुख्यमंत्र्यांनीच पाचारण केल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे मुंढे यांनीही मला मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्याचे सांगत दत्तक नाशिकची डुबती नौका वाचवण्याचे सुकाणू जणू हे आपल्याच हाती दिल्याचे संकेत दिले होते. 

 

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही हाती घेतलेल्या कोट्यवधीच्या कामांना ब्रेक लावला. इतिहासात प्रथमच महासभेच्या पटलावर ३२ कामांना मुंढेंनी थांबवत सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांतील नगरसेवकांनाही धक्का दिला. यात काही आमदारांचीही कामे होती. याबरोबरच घरपट्टीत तब्बल ३३ टक्के वाढीचा प्रस्ताव मुंढे यांच्या रेट्यामुळे सत्ताधारी भाजपने मंजूर केला. परिणामी नाशिकमध्ये भाजपविरोधात चौफेर टीका सुरू झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून अस्वस्थ झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. 


या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी मंत्रालयातच सचिवांकडे बैठकीच्या निमित्ताने आलेल्या मुंढे यांच्याशी चर्चा करताना विकासकामे मार्गी लावताना सकारात्मक दृष्टीने तोडगा कसा निघेल याबाबत नियोजन करण्याचे आवाहन केल्याचे समजते. त्याप्रमाणेच एकदम ३३ टक्के करवाढ करण्याऐवजी त्याची टक्केवारी कमी करून अन्य मार्गाने उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबतही विचार करण्याच्या दृष्टीने सूचना केल्याचे सांगितले जाते. मात्र, या सर्वाचा मुंढे यांनी स्पष्ट इन्कार करत केवळ पालकमंत्र्यांशी भेट झाल्याचे मान्य केले. 

बातम्या आणखी आहेत...