आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात 11 सिलिंडरच्या स्फाेटामुळे 63 झाेपड्या जळून खाक; अनेक संसार उघड्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकाेला शहरातील  मातानगरमध्ये गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अागडाेंब उसळला. एकापाठाेपाठ एक असे ११ घरगुती गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने या भागातील संपूर्ण झाेपडपट्टीलाच अागीने कवेत घेतले. यात ६३ झाेपड्या खाक झाल्या व त्यातील गाेरगरिबांचे संसार उघड्यावर अाले. या अग्निकांडात लाखाे रुपयांचे घरगुती साहित्य भस्मसात झाले. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवित हानी सुदैवाने झाली नाही. या वसाहतीशेजारी असलेल्या पाेलिस वसाहतीतील लाेकांनाही तातडीने घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात अाले. सिलिंडर स्फाेटाच्या कानठळ्या बसवणाऱ्या अावाजाने जवळच असलेल्या शाळांमधील विद्यार्थी भयभीत झाले हाेते. त्यांनाही शिक्षक व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलविले. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी ३० बंबांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून ही अाग अाटाेक्यात अाणली.


मातानगरमधील झाेपडपट्टीत हातावर पाेट असणारी अनेक कुटुंबीय अापला संसार थाटून अाहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका कुडाच्या झोपडीत महिला स्वयंपाक करीत होती. मात्र त्यांच्या झाेपडीतील गॅस सिलिंडर लिक झाल्याने कुडाने पेट घेतला व काही क्षणातच संपूर्ण झाेपडी अागीत भस्मसात झाली. कसाबसा जीव वाचवून झाेपडीबाहेर पडलेल्या महिलेने अारडाअाेरड केली, त्यामुळे परिसरातील लाेक जमा झाले. मात्र तत्पूर्वीच या अागीने लागून असलेल्या सुमारे ६३ झाेपड्यांना कवेत घेतले. काही क्षणातच या सर्व झाेपड्या जळून खाक झाल्या. या वेगवेगळ्या झाेपड्यांमधील ११ सिलिंडर फुटल्याने अागीची तीव्रता वाढली. परिणामी गरीब कुटुंबाने पै पै जमवून उभारलेल्या संसाराेपयाेगी साहित्याचीही राखरांगाेळी झाली.

 

महिलांचा हंबरडा
डाेळ्यादेखत अापली घरे जळत असल्याचे पाहून महिलांनी अक्षरश: हंबरडा फाेडला. काबाडकष्ट करून, पै पै जमवून जमा केलेले संसाराेपयाेगी साहित्याची  झालेली राखरांगाेळी पाहून त्यांच्या डाेळ्यातील अश्रूही गाेठले हाेते. काहींनी गाठोड्यात तर काहींनी कपाट, डब्यांमध्ये ठेवलेले पैसे आणि दागिनेही जळाले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अकोल्यातील आगीची भीषणता दर्शवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...