आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरवत एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. सफाई कर्मचाऱ्यासोबत कुटुंबातील मुलीचे प्रेमसंबंध असल्यामुळे दरंदले कुटुंबातील मुलीचे वडील, भाऊ आणि दोन काका यांनी दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून संगनमताने तिघांची निर्घृण हत्या केल्याचे सिद्ध झाल्याचे न्यायाधीश वैष्णव यांनी यावेळी जाहीर केले. मात्र, अशोक फालके या संशयित आरोपीविरुद्ध परिस्थितिजन्य पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. उर्वरित सहा जणांची शिक्षा येत्या १८ जानेवारीस सुनावण्यात येणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा हे हत्याकांड आंतरजातीय प्रेम प्रकरणातून झाल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरल्याने आता या आरोपींना फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१ जानेवारी २०१३ रोजी झालेल्या या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. न्यायाधीश वैष्णव यांनी या खटल्यात संशयित मुलीचे वडील पोपट दरंदले, भाऊ गणेश, काका प्रकाश आणि रमेश, आत्येभाऊ संदीप कुऱ्हे यांना दोषी ठरवले, तर मावसा अशोक फलके याच्याविरोधात पुरेसा पुरावा आढळून न आल्याने त्यांना निर्दोष ठरविले. नेवासा फाटा येथील बीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीचे त्यात संस्थेत सफाई कर्मचारी म्हणून कामास असलेल्या सचिनसोबतच्या प्रेमसंबंधातून ही तिहेरी हत्या झाल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. यास विरोध म्हणून मुलीच्या नातलगांनी सचिन आणि त्याचे मित्र राहूल आणि संदीप अशी तिघांची अमानुष हत्या केली. सचिनवरील रागामुळे गवत कापण्याच्या विळ्याने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते शेतातील विहिरीत आणि बोरवेलमध्ये टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर, संदीपचा मृतदेह सेफ्टीक टँकमध्ये टाकून टाकीत बुडून त्याचा आकस्मात मृत्यू झाल्याचा बनाव तयार करण्यात आला होता.
भीतीमुळे नाशिक न्यायालयात खटला वर्ग
नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षीदारांवर दबाव येऊ लागल्याने खटला अन्य जिल्ह्यात चालविण्याची विनंती मृत संदीपचा भाऊ लष्करी जवान पंकजने औरंगाबाद न्यायालयात याचिकेद्वारे केला. त्यानुसार हा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर गेले दिड व र्षांपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश वैष्णव यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ५३ साक्षीदार तपासले. १ जानेवारीस आरोपींच्या युक्तिवादाला उत्तर दिल्यावर १५ जानेवारीस या खटल्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार न्यायाधीश वैष्णव यांनी फालके वगळून अन्य सहा आरोपीं यात दोषी असल्यावर आज शिक्कामोर्तब केले. १८ जानेवारीस यांची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या खटल्यातील सातवा संशयित आरोपी अशोक फालके याची मात्र पुराव्याआभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याच्या वतीने अँड राहुल कासलीवाल यांनी काम बघितले.
कोर्टरूम लाइव्ह
> सकाळी ११.०० : सातही आरोपींची कारागृहातून न्यायालयात हजेरी
> सकाळी ११. ३० : न्या. वैष्णव यांचे आगमन
> सकाळी ११. ४० : न्यायमूर्तींकडून घटनाक्रम व दोषारोपपत्राचे वाचन
> दुपारी १२.०५ : कट-कारस्थान करून हत्या केल्याचा आरोप ६ जणांविरुद्ध सिद्ध, तर फालकेची > २५ हजारांच्या जामिनावर मुक्तता. शिक्षा १८ जानेवारीला सुनावण्याची घोषणा
> दुपारी १२.१० : निकाल ऐकताच नवगिरेचा संताप अनावर. ‘हा अन्याय आहे, माझा काही दोष नाही, कोणी हे केले ते मी सर्व सांगितले आहे. तरीही आधी पोलिसांनी माझ्यावर अन्याय केला, आता न्यायालय करत आहे’, अशी ओरडाओरड सुरू
> दुपारी १२.२० : कोर्टरूमबाहेर नवगिरेची फालकेविरोधात शिवीगाळ. पोलिसांनी फालके आणि नवगिरेला वेगवेगळे केले.
> दुपारी १२.३० : मुलीचे वडील, भाऊ आणि काका यांना अश्रू अनावर.
हे ही वाचा,
> यापुढे जातीय रंग असलेले खटले स्वीकारणार नाही, प्रचंड दबाव येतो : अॅड. उज्ज्वल निकम
> सोनई हत्याकांड; रक्तबंबाळ विळा, मोबाइलचे लोकेशन आणि 53 साक्षीदारांची तपासणी
> सोनई हत्याकांड मागोवा; प्रकरण गुंडाळले होते, पण भावाने दिला लढा!
नेमके काय होते, सोनई हत्याकांड प्रकरण वाचा पुढील स्लाइड्सवर... विशेष सरकारी वकील काय म्हणाले त्याचा व्हिडिओ पाहा अखेरच्या स्लाइड्सवर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.