आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; खोत-शेट्टी यांच्यात जुंपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी अन् राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने जुंपली. दोघेही तसे पाहिले तर स्वाभिमानी स्वभावाचे, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन मुखंड. एकाला अस्सल पश्चिम महाराष्ट्राचा बाज तर दुसऱ्यावर किंचितसा शेजारच्या राज्याचा प्रभाव. दोघांच्याही लढतीचे मैदान मुख्यत: उसाला रास्त भाव अन् शेतीविषयक प्रश्न. त्यामुळे आपसूकच संघटनेतील कार्यकर्त्यांमध्येदेखील सरळसरळ दोन नेत्यांच्या स्वामिनिष्ठेला अनुसरून विभागणी होणे अपरिहार्य. विद्यमान सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले सदाभाऊ यांच्याकडे तर शेट्टींनी सरकारच्या विरोधातच द्रोह केल्यामुळे खासदारकी वगळता कधीकाळी त्यांच्याकडे असलेली अशीच कवचकुंडले गळून पडलेली. आज पश्चिम महाराष्ट्राच्या काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये ज्या रीतीने या जोडीच्या समर्थकांमध्ये जुंपली; ती ठिणगी नाशिक मुक्कामी झालेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीतच पडली होती. सदाभाऊ यांना सरकारबरोबर राहायचे की त्यांची तडकाफडकी साथ सोडून लाल दिव्याचा त्याग करायचा असा अल्टिमेटम दिला गेला होता. तिकडे केंद्रात शेट्टी यांनीही सरकारसोबत राहायचे की नाही या मुद्द्यावर बराच खल झाला. सरतेशेवटी पाठिंबा काढून घ्यायचा निर्णय जाहीर केला. एकाने सरकारपासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतली तर दुसऱ्याने सरकारच्या सोबतच राज्यमंत्री म्हणून काम करणे पसंत केले. शेतकरी संप झाला अन् पाठोपाठ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीच्या दुफळ्या झाल्या. अति अभ्यासू अथवा अति हुशार मंडळी एकत्र आली की त्यांच्यात कधीच मतैक्य होत नाही असा आजवरचा लौकिक आहे. सुकाणू समितीतील सदस्यांमध्येही एकवाक्यता होऊ शकली नाही. अल्पावधीतच शेतकरी संपदेखील इतिहासजमा झाला. शेतीमालाला रास्त भाव, कृषी मूल्य आयोगाची अंमलबजावणी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत सरकारचे धोरण, कांदा उत्पादकांचे प्रश्न आदी मुद्द्यांसह कृषी विषयाशी संबंधित तात्त्विक मुद्दे पडले एका बाजूला अन् शेट्टी व खोत जोडीत जुंपली. शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी यांनी संघटना ऐन भरात असताना ‘पुढाऱ्यांना गावबंदी’ अथवा ‘मंत्र्यांना गावबंदी’ करण्याचा आदेश देऊन शेती प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी तसेच मंत्रिमंडळातील सदस्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे ही प्रामाणिक भूमिका होती. ऐंशीच्या दशकातील त्याच आदेशाची पुनरावृत्ती शेट्टी यांनी नव्या स्वरूपात करण्याचे आदेश स्वाभिमानी कार्यकर्त्यांना दिले. मग काय कार्यकर्ते सुसाट सुटले अन् पुढारी काय अन् मंत्री काय, त्यांच्या दृष्टीने सदाभाऊच. त्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक होऊ लागली. त्यांच्या समर्थकांवर हल्ले होऊ लागले. त्याला प्रत्युत्तर म्हणून मग भाऊंच्या समर्थकांनीही दगड उचलले. नंतर स्वाभिमानीच्या कार्यालयावर हल्ला केला अशा बातम्या येऊ लागल्या. दोहोंमध्ये शाब्दिक जुंपलेली लढाई नंतर कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवर आली. शेतकरी संघटना असो की आताची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील फाटाफूट नवीन नाही. शरद जोशी हयात असताना शेट्टी यांनी वेगळी चूल मांडली होती. जोशी यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी रघुनाथदादा पाटील, विजय जावंदिया, शंकरराव धोंडगे यांनीही संघटनेपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला, पण त्याला तात्त्विक कारणं होती असं जुनीजाणती मंडळी म्हणतात. शरद जोशी यांनी एकेकाळी राज्यसभेसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर व भूपेंद्रसिंग मान यांची नावे सुचवल्यामुळेही संघटनेच्या विदर्भातील नेत्यांमध्ये वाद उभा राहिला होता असे म्हणतात. याला कागदोपत्री कोणताही आधार नाही. पण शेतकरी संघटना असो की आताची स्वाभिमानी संघटना यांच्यात जेव्हा केव्हा धुसफूस झाली त्याला निवडणुकीची पार्श्वभूमी होती व आतादेखील ती आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर ऊस हा येथील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्र अन् थोड्याफार फरकाने अलीकडे मराठवाड्यात उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढले आहे. त्यानुसार राजकारणाच्याही केंद्राचा विस्तार होऊ लागला आहे. भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार धडक द्यायची असेल तर अस्सल बाज असलेला पुढारी हाताशी असायला हवा ही सत्ताधाऱ्यांची रणनीती. त्यामुळे स्वाभिमानीचे हल्ले परतवून लावतानाच सदाभाऊंच्या पाठीशी पाठबळ उभं करणं हा सरकारचा गनिमी कावा असू शकतो. शेतकरी संघटनेत एकेकाळी फुटीचे बीज रोवणाऱ्या नेत्यालाही संघटना फुटीला सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर शेतीच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात हातात रुमणं, उसाची टिपरं अन् कुऱ्हाडीचा दांडा घेऊन लढणारे कार्यकर्ते आता हीच आंदोलन सामग्री हाती घेत एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. 

 
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...