आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: केबीसी ते सिट्रस!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारे आर्थिक घोटाळे थांबायला तयार नाहीत. दिवसागणिक असे गडबड घोटाळे बाहेर येत असतात किंबहुना ते आजवर यावयाचे थांबलेले नाहीत. त्यामध्ये लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या लाभाला भुलत गुंतवणूक करतात अन् नंतर फसवणूक झाली म्हणून पश्चात्ताप करतात. पैसे जास्त मिळतात म्हणून कुठलाही मागचा पुढचा विचार न करता गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जशी कमी नाही, तद्वतच अशा फसणाऱ्यांना जाळ्यात ओढणाऱ्या संधिसाधूंचीही जगात कमतरता नाही.

 

योगायोग बघा, नाशिक जिल्ह्यातील ‘केबीसी’ अर्थात कौन बनेगा करोडपती या कंपनीच्या संचालकांनी सुमारे २५० कोटींहून अधिक घोटाळा केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना कोठडीत टाकण्यात आले होते. त्यांच्यावरच्या आरोपांची शहानिशा तपासी यंत्रणा करताहेत, पण त्या संस्थेचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब छबू चव्हाण जामिनावर बाहेर आला. तुरुंगातून त्याचे पाऊल बाहेर पडत नाही तोच केबीसीशी व्यवसाय साध्यर्म्य असलेला ‘सिट्रस’ या कंपनीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याचा मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका हा नेमका पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याच्याही आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती हजारो कोटींच्या घरात जाऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे. आधी चव्हाण अन् पाठोपाठ गोयंका तुरुंगात गेले तरी लोक सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने काही धडा घ्यायला तयार नाहीत.

 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत घोटाळे थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्या हे खरं तर अलीकडच्या कालखंडातील आर्थिक घोटाळ्यांचे अग्रणी वा म्होरके म्हणता येतील. फरक एवढाच की, त्यांचे घोटाळे हजारो वा लाखो कोटींच्या घरात गेले म्हणून त्याचा बभ्रा जरा जास्त झाला. घोटाळे केल्यानंतर हे म्होरके परदेशात पळून गेल्याने ते बराच काळ बातम्यांच्या केंद्रस्थानी राहू शकले.

 

पण, जिल्हा पातळीवरील नाशिक असो की राज्य पातळीवरील अन्य आर्थिक घोटाळे याची वाच्यता ही जेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार नाडला जातो, फसवला जातो, त्याचे कुटुंब देशोधडीला लागण्याची वेळ येते तेव्हा कुठे दबक्या आवाजात होऊ लागते. हे सर्व होईपर्यंत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेलेले असते. पोलिस ठाण्यापर्यंत पहिली तक्रार जाते तोवर घोटाळ्याचा जो कुणी सूत्रधार असतो तो परागंदा झालेला असतो. त्याचा शोध घेऊन तपास पूर्णत्वास जात नाही तोवर गुंतवणूकदारांची मानसिकता काटेरी जंगलात हरवल्यासारखी होते. पण, जे या घोटाळ्यांमध्ये दलालाच्या अर्थात एजंटांच्या भूमिकेत होते त्यांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. ती बरीच मंडळी घोटाळ्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागीदार असतानाही नामानिराळी राहिली. सिट्रस चेक इन्स लिमिटेड या कंपनीनेही महाराष्ट्रासह गुजरात व गोवा या राज्यांमध्ये कामकाजाचे जाळे पसरवले होते. गुंतवणुकीवर जादा व्याज देण्याच्या प्रलोभनाला तिन्ही राज्यांतील गुंतवणूकदार भुलले अन् फसले.

 

अठरा लाख वा त्याहून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला गेल्याचे उघडकीस येत आहे. या घोटाळ्याचीही पहिली तक्रार नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये नोंदवली गेली. तपास सुरू झाल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होत गेला अन् हा घोटाळा साडेसात हजार कोटींच्या आसपास असल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. सिट्रसच्याही आधी केबीसी, मैत्रेय, समृद्धी जीवन, पॅनकार्ड क्लब, एनमार्ट, फडणवीस इन्फ्रा, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांचे घोटाळे अलीकडच्या काळात उघडकीस आल्यामुळे त्याची वाच्यता झाली. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीमध्ये अनेक कंपन्या गुंतलेल्या असताना त्यातील काही मोजक्या कंपन्यांची नावे चव्हाट्यावर आली. पैसे किती परत मिळाले, फसवणूक झालेल्या किती गुंतवणूकदारांना ‘नही चोर, चोर की लंगोटी सही’ या उक्तीप्रमाणे रक्कम पदरात पडली अशी उदाहरणे सापडणे दुर्मिळच. नाशिकचे माजी पोलिस आयुक्त एस् जगन्नाथन् यांनी इंटरपोलपासून अन्य तपासी संस्थांची मदत घेत आर्थिक गुन्ह्यांचा तपास लावण्यात पुढाकार घेतल्यामुळे केबीसीच्या मुख्य सूत्रधाराला सिंगापूरहून बाहेर पडणे भाग पडले व त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला. अर्थात केबीसीच्या घोटाळ्यात नात्यागोत्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचाच सहभाग असल्याचे उघड झाल्यावर ‘कुंपणागत’ स्थिती झाली.

 

एक मात्र खरे की, मैत्रेय या कंपनीकडून कोट्यवधी रुपये वसूल करून ते गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करण्याची कामगिरीही जगन्नाथन यांच्याच कारकीर्दीत होऊ शकली. त्यामुळे मैत्रेयव्यतिरिक्त अलीकडे उघडकीस आलेल्या सिट्रस कंपनीच्या घोटाळ्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांची रक्कम सहीसलामत परत मिळावी म्हणून आताच्या पोलिस यंत्रणेला काळजी घ्यावी लागेल, हे निर्विवाद. 

 

जयप्रकाश पवार  

निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...