आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट जात दाखवणाऱ्या दाभाडेंना बढतीचे ‘कल्याण’; कामगार कल्याण मंडळाचा अजब कारभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जातीचे खोटे जात प्रमाणपत्र सादर करून कामगार कल्याण अधिकारी म्हणून सुरू झालेल्या व पुढे सदर खोटे प्रमाणपत्र जप्त होऊनही शासनाच्या ‘सेवेत’ राहण्याचे ‘कल्याण’ साधणाऱ्या सतीश दाभाडे यांना बडतर्फीऐवजी कामगार कल्याणमंत्र्यांनी थेट कामगार कल्याण आयुक्तपदी बढती दिली. 


विभागातील ५ अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून दाभाडेंना नियमबाह्य बढती दिल्याचा ठपका एका तक्रारीत करण्यात आला अाहे. यावरून अन्यही काही कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्रांची पडताळणी न करता सेवा व बढत्या दिल्याचा संशय व्यक्त हाेत अाहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेसाठी प्रधान सचिवांनी सर्व विभागांकडून तत्काळ माहिती मागवण्यात अाली अाहे.   


कामगार कल्याण विभागातील उपायुक्त सतीश दाभाडे यांना हलबा जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्य शासनाच्या सेवेत नोकरी मिळवली. मात्र, १६ नोव्हेंबर १९९० रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांनी त्यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे व दाभाडे हे हलबा नाही, तर कोष्टी असल्याचे मंडळास कळवले. त्यानुसार २७ जानेवारी २००० रोजी दाभाडेंचे बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. अशा अधिकाऱ्यास बनावट प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल शासन सेवेतून बडतर्फ करण्याऐवजी विद्यमान कामगार कल्याण खात्यातर्फे त्यांना कामगार कल्याण आयुक्तपदाचा पदभार देण्यात आले. दाभाडे यांच्यावर  अन्यही अनेक गैरव्यवहारांचा ठपका आहे.  या तक्रारींबाबत सुरू चौकशीबाबत प्रशासनाने दिलेला अहवाल डावलून दाभाडेंना हा पदभार देण्यात आल्याने, यात नेमके काय व कोणाचे ‘कल्याण’ साधण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

 

दाभाडेंविरोधात तक्रारी  
- नागपूर विभागात  कामगार पाल्यांच्या शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार  
- नोकरीचे आमिष दाखवून आदिवासी तरुणांकडून वसुली  
- निधी वसुलीचे अधिकार नसताना कंपन्यांना संपर्क करून देणग्या संकलन

बातम्या आणखी आहेत...