आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट रोड : अशोकस्तंभ-त्र्यंबकनाका दरम्यान अाता जागा संपादनाचा घाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेमधून १६ कोटी रुपये खर्चून शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका यादरम्यान होणाऱ्या स्मार्ट रोडसाठी एकसारखी रुंदी मिळवण्याकरता सद्यस्थितीमधील रस्त्यालगतच्या मिळकतींची पुढील जागा अर्थातच फ्रंट मार्जिनची जागा संपादनाचा घाट घातला जात असल्याचे वृत्त अाहे. परिणामी, या ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेल्या मिळकती संकटात येण्याची भीती असून त्यास विराेध हाेण्याची शक्यता आहे. 


महापालिका आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील विकासकामांना गती मिळाली आहे. यातील बहुतांशी कामे ही माजी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात मंजूर झाली आहेत. स्मार्ट सिटीसाठी काही दिवसांपूर्वीच बैठक झाली असून, त्यात अशोकस्तंभ-त्र्यंबकनाका यादरम्यानच्या १६ कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या स्मार्ट रोडसाठी निविदाही निश्चित करण्यात आली. साधारण सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. 


नाशिकमधील आदर्श रस्ता म्हणून हा प्रकल्प प्रशासनासाठी महत्त्वाचा असताना आता त्यास मोठ्या वादाचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अशोकस्तंभ-त्र्यंबकनाका यादरम्यान या रस्त्याला एकसारखी रुंदी मिळणे अशक्य झाले आहे. या रस्त्याचे दोन प्रमुख सिग्नलमुळे तीन टप्प्यात विभाजन झाले आहे. त्यात अशोकस्तंभ ते मेहेर हा पहिला टप्पा, मेहेर ते सीबीएस हा दुसरा टप्पा तर सीबीएस ते त्र्यंबकनाका हा तिसरा टप्पा आहे. सरसकट ३० मीटर रुंदीचा हा रस्ता तयार केला जाणार असून, यात मोठी अडचण एकसारखी रुंदी ठेवण्याबाबत असल्याचे उशिराने लक्षात आले आहे. उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार सीबीएस ते मेहेर यादरम्यान ३० मीटरचा रस्ता असल्यामुळे येथे कोणतीही अडचण नाही वा रस्ता रुंदीकरणासाठी अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका हा रस्ता स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्याचे महापालिकेकडून प्रस्तावित आहे. 


लगतच्या मिळकतींची भूसंपादन करण्याची आवश्यकता नाही. मात्र अशोकस्तंभ ते मेहेर तसेच सीबीएस ते त्र्यंबकनाका येथे रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे एकसारखा स्मार्ट रोड तयार करणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही टप्प्यांमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी लगतच्या मिळकतींचे फ्रंट मार्जिनची जागा स्मार्ट सिटी कंपनीला आवश्यक वाटू लागली आहे. त्यामुळे येथील मिळकतींची जागा संपादन करण्यासाठी कलम २१० अन्वये भूसंपादनासाठी विचार सुरू झाला आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहार कंपनीने आयुक्तांकडे केल्याचे वृत्त आहे. 


जागाच नाही तर देणार काेठून?
सध्या महापालिकेने साडेसहा व सात मीटर रस्त्या समोर असलेल्या कपाटाशी संबंधित इमारती नियमित करण्यासाठी मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियमातील कलम २१० भूसंपादनाची शक्कल लढवली आहे. त्यात या कलमांद्वारे छोट्या रस्त्यालगतच्या जागामालकाकडून मिळवून ९ मीटरपर्यंत रस्ता बनवण्याचा प्रयत्न आहे. त्याबदल्यात जे जागा देतील त्यांना वाढीव एफएसआय व टीडीआर याच ठिकाणी वापरासाठी दिला जाणार आहे. स्मार्ट रोडची रुंदी एकसारखी ठेवण्यासाठी हाच फॉर्म्युला विचारात असून, त्यास याच रस्त्यामधील जुन्या नाशिककरांकडून जोरदार विरोध अशी शक्यता आहे. या रस्त्यावर जिल्हा बँक, स्टेट बँकेसह मोठ्या शाळाही आहेत. असेच बड्या राजकीय लोकांशी संबंधित न्यायप्रविष्ट असलेल्या मिळकती आहेत. अनेक मिळकती जुन्या नियमानुसार बांधल्या असल्यामुळे पुरेसा फ्रंट मार्जिनही साेडलेला नाही. अशा परिस्थितीत या मिळकतींची जागा महापालिकेला मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असून परिणामी स्मार्ट रोड अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

 

फूटपाथ, सायकल ट्रॅक संकटात 
सूत्रांच्या माहितीनुसार, २१ ते २६ मीटर अशी सरासरी या संपूर्ण रस्त्याची रुंदी अाहे. स्मार्ट राेडसाठी एकसारखी रुंदी अावश्यक अाहे. हा रस्ता किमान ३० मीटर करणे गरजेचे असून, तरच येथे एकसारखे दाेन्ही बाजूने पदपाथ तसेच, सायकल ट्रॅकसाठी जागा साेडता येतील. याबराेबरच येथे बसण्यासाठी बाकडे, वायफाय व अन्य सुविधांसाठी जागा उपलब्ध हाेईल. या रस्त्यासाठी मूळ सर्वेक्षण वा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने केला असून, त्यांनी अन्य सुविधांसाठी जागा कशी उपलब्ध हाेईल याबाबत विचारातच केला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 

बातम्या आणखी आहेत...