आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या सुनीता पाटील यांना श्रमसेवा, मुंबईच्या दुर्गा गुडीलू यांना रुक्मिणी पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- यशवंतराव चव्हाण महारष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. अशा पद्धतीने दिल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी शुक्रवारी नाशिक येथे केली. पुरस्कारार्थींमध्ये नाशिकच्या सुनीता पाटील यांना श्रमसेवा, मुंबईच्या दुर्गा गुडीलू यांना रुक्मिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


विशाखा काव्य पुरस्कारात ठाण्याच्या सुशीलकुमार शिंदे, सिन्नर (नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचा समावेश आहे. श्रमसेवा पुरस्कार आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा महिलांच्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा 'श्रमसेवा पुरस्कार' नाशिक येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या श्रीमती सुनीता पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रुक्मिणी पुरस्कार वैदू या मागासलेल्या समाजासाठी काम करणाऱ्या श्रीमती दुर्गा मल्लू गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजातील ११२ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. 


समाजातील महिलांचे ५८ बचतगट स्थापन करून प्रौढशिक्षण वर्गात बसवले. अशा ८४ महिला मुंबईतील हॉटेल्सना रोज ३ हजार चपाती बनवून देण्याचे काम करतात. टिफीन सर्व्हिसबरोबरच अनेक शाळांना नाश्ता बनवून देण्याचे काम करत आहेत. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विशाखा काव्य पुरस्कार कवी कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जातात. २१ हजारांचा प्रथम पुरस्कार ठाणे येथील कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या 'आत्महत्या करायचं म्हणतंय' काव्यसंग्रहास, १५ हजारांचा द्वितीय पुरस्कार 'येठण' या सिन्नर (नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे यांच्या काव्यसंग्रहास तर १० हजारांचा तृतीय पुरस्कार सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या 'अस्तित्वाचा अजिंठा कोरताना' या काव्यसंग्रहास दिला जाणार आहे. 


पुरस्कार वितरण समारंभ मंगळवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजता गंगापूररोडवरील शगुन हॉलमध्ये होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी किशोर पाठक उपस्थित राहणार अाहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ-वायुनंदन अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. विजया पाटील, जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे यांनी केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...