आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळा बंद करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही :राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड- राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याचा घाट भाजप-सेना सरकारने आखला असून सरकारचा हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निफाड येथे शनिवारी दिला.   


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निफाड येथील शिवाजी चौकात हल्लाबोल सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, चित्रा वाघ, हेमंत टकले, आमदार पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, शशिकांत शिंदे, जयवंत जाधव, नरहरी झिरवाळ, देविदास पिंगळे, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, दिलीप बनकर, तालुकाध्यक्ष अनिल कुंदे उपस्थित होते. स्वागत अनिल कुंदे यांनी तर दिलीप बनकर यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांच्या राजकीय प्रवासात स्वर्गीय आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ यांचे फार मोठे योगदान आहे. नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांचा व मुंबई व धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचा  विकास केवळ भुजबळ यांच्यामुळेच झाला असल्याचे त्यांनी या वेळी ठासून सांगितले. या सरकारच्या काळात मुली, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला.   


तटकरे म्हणाले की, या सरकारकडे बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गासाठी पैसे आहेत;  परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यांच्याकडे पैसे नाहीत. जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत हल्लाबोल मोर्चा थांबणार नाही, असा इशारा  तटकरे यांनी या वेळी  दिला. 

 

अाश्वासने हवेतच : मुंडे  
देशातील १२५ कोटी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी जनतेचा स्वप्नभंग केला आहे. बँक खात्यावर १५ लाख येणार, विदेशातील काळा पैसा आणणार, बेरोजगारी दूर करणार, अशी अनेक आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते मुंडे यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...