आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विधानपरिषद: शंकास्पद मतांवर आधी निर्णय, मगच कोटा निश्चिती व मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानपरिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतमोजणीत गतवेळी बाद आणि शंकास्पद मतांवरून झालेला गोंधळ आणि वादविवादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रसंगी प्रथम बाद आणि शंकास्पद मतांवर अंतिम निर्णय घेण्याचे ठरविले आहे. संबंधितांचे शंकानिरसन झाल्यानंतरच कोटा निश्चिती करत प्रत्यक्ष मतमोजणी केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना स्पष्ट केले. 


सहा वर्षांपूर्वी मतमोजणी वेळी बाद व शंकास्पद मतांवरून दोन्ही उमेदवारांनी जोरदार आक्षेप नोंदविले होते. उभयंता आपआपले म्हणणे रेटत राहिल्याने वाद पराकोटीला गेला होता. मतसंख्या समसमान असल्याने अखेर बऱ्याच भवती न् भवतीनंतर चिठ्ठी पद्धतीने जयवंतराव जाधव यांना विजयी घोषित केले गेले. परंतु, त्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड. शिवाजी सहाणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. असा प्रसंग पुन्हा उद‌्भवू नये म्हणून यावेळी सावध पावले उचलण्यात आली आहेत. 


यंदाची निवडणूक चुरशीची झाली असून, तीन उमेदवार रिंगणात असले तरीही अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांनी ऐनवेळी प्रचार थांबविल्याने काँग्रेस आघाडीचे अॅड. शिवाजी सहाणे आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यातच सरळ लढत झाली. पालघरचा वचपा काढण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याने ही निवडणूक राज्यपातळीवर चर्चेची ठरली आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच नजरा आता गुरुवारच्या निकालावर असून प्रत्यक्ष मतमोजणीवेळी कुठलाही गोंधळ नको यासाठी प्रशासनानेही कंबर कसली आहे. मतमोजणीबाबत आयोगाच्या सूचनांचा, मार्गदर्शक तत्त्वांचा अधिकाऱ्यांकडून अभ्यास केला जात आहेत. पुन्हा पुन्हा तरतुदी वाचून ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आताच शोधली जात आहेत. गतवेळचा अनुभव पाहता यावेळी बाद आणि शंकास्पद मतांवरील निर्णय प्रथम घेतला जाईल. 


संबंधित उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींचे त्याबाबत समाधान झाले की घेतलेला निर्णय अंतिम राहील. पुन्हा बाद अथवा शंकास्पद मतपत्रिकांवर कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. तो मुद्दा तेथेच निकाली काढला जाईल. नंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. मतदाराने 'नोटा'ला प्रथम पसंती दिली असल्यास संबधित मतपत्रिकेवरील इतर प्राधान्यक्रम विचारात घेतला जाणार नाही. ती मतपत्रिका सरळ बाद ठरविली जाईल. 


त्यावर पुन्हा कुठलाही विचार होणार नाही. मतपत्रिकेवर आकडे किंवा अक्षरे टाकताना काही तांत्रिक बाबी असल्यास त्यावर निर्णय घेतल्यानंतरच वैध आणि अवैध मते निश्चित करून वैध मतांच्या आधारावर कोटा ठरविला जाईल. त्यानंतरच मतमोजणीला सुरुवात होईल. 


अशी होईल मोजणी 
शंकास्पद आणि 'नोटा'ला प्राधान्य दिलेल्या मतपत्रिकांवर प्रथम निर्णय हाेईल. निर्णय अंतिम झाल्यावर उर्वरित वैध मतांनुसार विजयी मतांचा कोटा ठरविला जाईल. तिन्ही उमेदवारांच्या नावाची स्वतंत्र खाेकी असतील त्यात त्यांच्या नावाच्या प्रथम क्रमांकाच्या मतपत्रिका टाकून माेजणी केली जाईल. प्रथम क्रमांकाच्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवार विजयी घोषित केला जाईल. पहिल्या फेरीत कोटा पूर्ण न झाल्यास तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराची दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मते ही त्या-त्या उमेदवारांना दिल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या फेरीतील मते एकत्र केली जातील. कोटा तपासून तो पूर्ण करणारा विजयी होईल. तरीही कोटा पूर्ण न झाल्यास 'कंटिन्युइंग' (ज्याला अधिक मते असतील तो) उमेदवार विजयी होईल. 

बातम्या आणखी आहेत...