आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- गतवर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिकणाऱ्या तब्बल ८५ हजार विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल दिल्याची बाब समोर आल्यानंतर यंदा तरी 'मुक्त'चा परीक्षा विभाग 'पारदर्शक' होईल अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही मुक्त विद्यापीठात गोंधळ सुरूच असून, 'बीबीए' शाखेचा पेपर फुटल्याची माहिती असतानाही तसेच त्या फुटलेल्या पेपर्स घेऊन कॉपी करताना विद्यार्थी पकडलेले असतानाही विद्यापीठाने संबंधितांवर कारवाई न करता चक्क निकाल जाहीर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या पेपरफुटीत मुक्त विद्यापीठात 'लर्न अॅण्ड अर्न' या योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी तब्बल सात लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी तब्बल ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची बाब समोर आली होती. या उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसंदर्भातही कुठलीही माहिती परीक्षा विभागाकडे नव्हती. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर बी. एस्सी. एमएलटी या विद्याशाखेच्या तीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात घोळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली हाेती. बी.एस्सी. एमएलटीच्या एचएससी १२५, १२६, १२८, १२० व एचएससी १२३ या उत्तरपत्रिकांची तपासणीच झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. परीक्षा विभागात गेल्या वर्षी झालेल्या गोंधळानंतर यावर्षी तरी चांगले काम होईल अशी अपेक्षा होती. मात्र, घाेळ थांबत नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या मुक्त विद्यापीठाच्या बीबीएचा पेपर सुरू असताना काही विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. या विद्यार्थ्यांकडे सर्व प्रश्न क्रमांकानिहाय लिहिलेले आढळून आले. यामुळे हा पेपर अाधीच फुटल्याचे पथकाच्या निदर्शनात आले. पथकाने संबंधित विद्यार्थ्यावर कॉपी केस करत त्याला दोन वर्षांसाठी महाविद्यालयातून रद्द करावे अशा सूचना केल्या. मात्र, या विद्यार्थ्यांवर कारवाई न करता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल अतिशय चांगले गुण लावण्यात आल्याने विद्यापीठाच्या कार्यावर प्रश्न उपस्थित हाेत अाहे.
'लर्न अॅण्ड अर्न'च्या विद्यार्थ्यांचा समावेश
बीबीएच्या जे विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले हाेते, त्यातील विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात 'लर्न अॅण्ड अर्न' या योजनेत काम करत असल्याचे समोर आले आहे. ललित कैलास महाजन असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्याला दोन वर्षांसाठी बाहेर करण्याच्या सूचना केलेल्या असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्याचा निकाल लागल्याने नेमके त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे, अशी चर्चा विद्यापीठात सुरू आहे.
उच्च अधिकाऱ्यांना माहितीच नाही
या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांच्याशी दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनच उचलला नाही.
पेपर फुटला कसा?
मुक्त विद्यापीठाचे प्रश्नपत्रिका महाराष्ट्र ज्ञान महामंडळ या संस्थेमार्फत तयार केल्या जातात. प्रश्नपत्रिका शक्यतो परीक्षेच्या काही दिवस अगाेदर विद्यापीठात येते. असे असतानाही बीबीएच्या विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न कसे गेले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.