आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा ‘चेतक’ गुजरातच्या सरहद्दीवर; मजल दरमजल करीत प्रभावी गटांशी केली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे देशभरातील मुख्यमंत्री अाणि ज्येष्ठ नेत्यांच्या सभा, प्रचाराच्या फेऱ्या झडत असताना एेन मतदानाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चेतक’च्या उद्घाटनाचे निमित्त साधत गुजरातच्या सरहद्दीवर धडक दिली. 


नंदूरबारपासून नाशिकचा २५० किलाेमीटरचा प्रवास हेलिकॉप्टर अथवा विमानाने शक्य असतानाही ताे टाळून मुख्यमंत्र्यांनी मजल दरमजल करीत गुजरातच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये प्रभावशाली गटांच्या भेटी घेत शेजारच्या मतदारसंघात पहिल्या टप्प्यात हाेणाऱ्या मतदानासाठी जणू सक्रीय भूमिका बजावण्याचे काम केले. गत दाेन ते अडीच दशकांपासून एकहाती सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये कधी नव्हे ते यंदाच्या निवडणुकीत काॅंग्रसेने प्रबळ अाव्हान निर्माण केल्याचे दिसून येत अाहे. गुजरातच्या विकासाच्या माॅडेलवरच पंतप्रधानपदापर्यंत नरेंद्र माेदी यांनी मजल मारली. मात्र, त्याच गुजरातमध्ये त्यांना प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढावा लागत अाहे. 


एवढेच नव्हे तर भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून प्रचाराच्या सभा, रॅली काढून मतदारांना अाकर्षित केले जात अाहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार अाणि नाशिक या चारही जिल्ह्यांच्या सीमेलगत गुजरातमधील धरमपूर, बलसाड, लिंबायत, सुरत, बडाेदा, अमदाबाद येथील मतदारसंघात कसमा-खान्देशी मतदारांची संख्या लक्षणीय अाहे. 


यात, सुरतमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून धुळे- जळगावमधील मूळ रहिवासी सी. अार. पाटील हे खासदार असून त्यांच्याच निकटवर्तीयांचा अामदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दबदबा अाहे. यासह नंदूरबार जिल्ह्यातील शहादा, तळाेदा, दाेंडाईचा तालुक्यातील व्यापारी,व्यासायिकांचा राेजचा संबंध गुजरातमध्ये येत असल्याने अाणि या मतदारसंघात पहिल्या टप्प्याचे डिसेंबरला मतदान हाेत अाहे. ही अचूक वेळ मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधत शिंदखेड्यातील सारंगखेडा येथे भरणाऱ्या घाेड्यांचे प्रदर्शन अाणि विक्रीच्या महाेत्सवाला पर्यटनाची जाेड दिली. या चेतक महाेत्सवाच्या निमित्ताने या भागात दाैरा केला. त्याचबराेबर शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच हाेणाऱ्या अाणि वर्षांनुवर्ष काॅंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या तळाेदा अाणि नंदूरबार नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी जाहीर सभा घेतल्या. या ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी प्रबळ उमेदवार देत त्यांच्याही प्रचारासाठी हजेरी लावून त्यात भरच पाडली अाहे. विशेष म्हणजे या दाेन्ही ठिकाणी दिलेले उमेदवारांचेदेखील गुजरात कनेक्शन जगजाहीर असून त्यांच्या निमित्ताने या मतदारसंघातील प्रभावी घटकांशी त्यांनी थेट संवाद साधला. 


नंदूरबार, जळगाव धुळे या तीनही जिल्ह्यातील प्रमुख शहरे, माेठ्या गावांच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांनी अचनाक भेटी देवून तेथील पदाधिकारी, नागरिकांशी चर्चा केली. यामागे तिथल्या कुठल्याही स्थानिक निवडणुका नसल्या तरी केवळ गुजरातच्या निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवूनच त्यांनी हा गाेपनीय दाैरा केल्याचे बाेलले जात अाहे. या दाैऱ्याचे नियाेजन अचानक झाले असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे पक्षाच्या केंद्रीय पातळीवरूनच मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे गुजरातमधील मतदारंसघासाठी रणनिती अाखल्याचेही सूत्रांकडून समजते. हेलीकॉप्टर अथवा विमानाने अवघ्या ३० मिनिटांचा हा सुखकर प्रवास साेडून मुख्यमंत्र्यांनी तब्बल पाच तास अापल्या वाहनाने प्रवास करीत रात्री उशिरा नाशिक गाठले. 

 

मध्यरात्री नाशिकमध्ये 
मुख्यमंत्रीफडणवीस शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२.२५ वाजता नाशिकमधील शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले. नंदुरबार येथील सभास्थळाहून सायंकाळी ५.५० वाजता ते वाहनाने नाशिककडे निघाले होते. शनिवारी (दि. ९) सकाळी ९.३० ला ते हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करतील.  

बातम्या आणखी आहेत...