आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल वाहिनी फोडण्यामागे माेठी टोळी असण्याची चिन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे बुधवारी रात्री भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची डिझेलची पाइपलाइन फाेडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न झाला. त्यामधून लाखो लिटर डिझेल वाया गेले आहे. या पाईपलाईनला हॅण्डड्रील च्या सहाय्याने छिद्र पाडून त्याला ताेटी बसवून डिझेलची चोरी केली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामागे टाेळी असण्याची चिन्हे दिसत असूनही मोठी सुरक्षितता घेणाऱ्या इंधन कंपन्या अत्यंत महत्त्वाची पाइपलाइनकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 


मनमाडजवळ पानेवाडी येथे इंधन कंपन्यांचे डेपो आहेत, या ठिकाणी जाण्यासाठी मोठी सुरक्षितता आहे तेथे सर्वसामान्य माणूस पोहाेचू शकत नाही मात्र डिझेल वाहतूक करणाऱ्या पाईपलाईन मधून चोरी होतेच, कशी यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. इंधन करणारी पाईपलाईन फुटली तरी संगणकाद्वारे त्याची तातडीने माहिती मुख्य कार्यालयाला मिळत असल्याची माहिती आहे मात्र रात्रीतून पाईपलाईन फोडण्यात आली तरी सकाळ पर्यंत ही माहिती अधिकाऱ्यांना मिळू शकले नाही याबाबत साशंकता निर्माण होत आहे. 


या पाईपलाईन ला सुरक्षा कर्मचारी तैनात असताना ही चोरी होतेच कशी काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात असून सहा ते सात फुट खड्डा एका रात्रीतून चोरटे करू शकत नाही त्यातच हॅण्डड्रील करुन त्याला काॅक बसवला जातोय हे तर एका रात्रीतून करणे अजिबात शक्य नाही होणार त्यामुळे हे काम एका व्यक्तीने केले नसून या पाठीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता असल्याची चर्चा यानिमित्ताने परिसरात आहे. सलग दुसऱ्या दिवशी खानगाव थडी येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची अधिकारी उपस्थित होते. फुटलेली पाइपलाइन बंद करण्यात अधिकारी यशस्वी झाले असले तरी यातील इंधन पुरवठा सुरू झाला की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. 


अनुभवी टोळीची शक्यता 
भारत पेट्रोलियमची पाईपलाईन या अगोदर तीन ठिकाणी तोडली गेली हाेती. दरवेळी लाखो लिटर डिझेल वाया गेले होते. अातादेखील त्याच टाेळीने हा प्रकार केल्याचा संशय असून अतिशय काळजीपूर्वक आणि नियोजनबद्धपणे हे कृत्य केले जात अाहे. कोणताही पुरावा मागे सोडला जात नसल्याने ही टोळी अनुभवी असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. 


आरोग्याचा प्रश्न गंभीर 
खानगाव येथे तोडलेल्या पाईपलाईनमधून गळालेले डिझेल किमान एक हजार फूट जमिनीवर पसरले आहे. जवळच गोदावरी नदीचे पात्र आहे, नदी लगत अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिका अाणि विहिरी असल्याने त्यात हे इंधन मिसळल्यास नागरिकांना पाेटाचे विकार अाणि जनावरांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त हाेत आहे. 


माॅकड्रीलमध्ये केवळ दहा मिनिटे, प्रत्यक्षात जाेडणीसाठी दाेन दिवस 
पानेवाडी येथील इंधन डेपोमध्ये सहा महिन्यांपूर्वी माॅकड्रील घेण्यात आली होती. यावेळी इंधन पाईपलाईन गळती झाल्यास ती कशी थांबवता येईल, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. या वेळी केवळ दहा मिनिटात तर पूर्ववत जाेण्यात आली होती. मात्र चोरीच्या उद्देशाने फोडलेली पाईपलाईन जाेडण्यास मात्र प्रत्यक्षात दिवस लागल्यामुळे अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. 


पेट्रोलियम पाईपलाईन तोडल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल 
बुधवारी रात्री वाजेच्या सुमारास खानगाव येथे पाइप फोडण्यात आलेल्या ठिकाणाहून लाखो लिटर डिझेल वाया गेले आहे यासंदर्भात भारत पेट्रोलियमचे या भागातील लाईनमन ब्राहमने यांनी सायखेडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे अज्ञात व्यक्तींविरोधात सार्वजनिक मालमत्ता नुकसान अंतर्गत सेक्शन अंतर्गत अाणि भारतीय दंड विधान कलम ५११, ३७९, ४२७, ३४ अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सायखेडा पोलिस निरीक्षक आंबदास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 


पाइप लाइनची सुरक्षा रामभरोसेच 
अत्यंतसंवेदनशील असलेल्या इंधन पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला छिद्र पाडून चोरी होते. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था कशी असेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असताना ही पाइपलाइन फोडली कशी जाते रात्रीतून लाखो लिटर डिझेल गळती होऊन ते अधिकाऱ्यांना लक्षात येत नाही, या घटनाक्रमावरुन हे सर्व रामभरोसेच चालू आहे, असे म्हणावे लागेल. 


दुसऱ्या दिवशीही सुरू होते डिझेल गोळा करण्याचे काम 
बुधवारी रात्री इंधन पुरवठा करणारी पाईपलाईन फोडण्यात आली होती. त्यातून लाखो लिटर डिझेल गळती झाली. गुरुवारी हे इंधन परिसरातील शेतातून गोळा करण्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतरदेखील अधिकारीवर्ग शुक्रवारी देखील हे इंधन गोळा करण्याच्या कामात मग्न हाेता. 

बातम्या आणखी आहेत...