आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : 100 पैकी 55 शेतकरी आत्महत्या बिगर थकबाकीदारांच्या; इतर कारणांकडे लक्ष केव्हा देणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक​- शेतकरी आत्महत्यांबाबत आतापर्यंत विदर्भ आणि मराठवाडा चर्चेत असला तरी या प्रश्नाची व्याप्ती वाढत असून यंदा एकट्या नाशिक जिल्ह्यातच शेतकरी आत्महत्यांनी शंभरी गाठली आहे. पतपुरवठा आराखड्यात आघाडीवर असलेल्या आणि कृषी संपन्नतेचा वारसा सांगणाऱ्या नाशिक जिल्ह्यात ही स्थिती का ओढवली, त्याचा शोध ‘दिव्य मराठी’ने घेतला असता या १०० पैकी ४५ शेतकरी थकबाकीदार होते, तर ५५ शेतकऱ्यांचे प्रश्न निराळेच असल्याचे वास्तव पुढे आले. कर्जबाजारीपणा हे शेतकरी आत्महत्यांमागील महत्त्वाचे कारण आहेच; परंतु त्यासोबत सामाजिक प्रतिष्ठा, नातलगांकडील उधारी, आजारपण, नापिकी व व्यसनाधीनता ही कारणेदेखील यामागे प्रामुख्याने असल्याची नोंद सरकार दप्तरी आहे. ही अन्य कारणे लक्षात घेऊन प्रशासकीय स्तरावर त्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना होत  नसल्याचे दिसते. या कारणांकडे लक्ष वेधले जाव,आत्महत्यांना आळा बसावा या हेतूने हा ग्राउंड रिपोर्ट...

 

समाधानकारक पाऊस, शेती कर्जमाफीचा निर्णय आणि बाजारभाव या तिन्ही बाबी सकारात्मक असतानाही यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख चढताच आहे. विशेष म्हणजे नाशिकसारख्या सधन जिल्ह्यातही यंदा शेतकरी आत्महत्यांनी शंभरी ओलांडली आहे. या १०० आत्महत्यांबाबत महसूल यंत्रणेचे अहवाल व पोलिसांचे पंचनामे यांची छाननी करून ‘दिव्य मराठी’ने केस स्टडी केली असता त्यामध्ये आत्महत्यांमागे कर्जाच्या थकबाकीसोबत नैराश्य, आजारपण, व्यसनाधीनता, सामाजिक प्रतिष्ठा आिण नापिकी हीदेखील गंभीर कारणे असल्याचे पुढे आले. 


राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त म्हणून परिचित असलेल्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यांतील शासनाच्या पथदर्शी उपाययोजनांमध्ये शेतीची उत्पादकता वाढ, सामूहिक शेतीसारख्या प्रयत्नांतून उत्पादन खर्चात घट, शेतकऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ, सामूहिक विवाह, समुपदेशन आणि रोगनिदान व उपचार शिबिरे यांसारखे सर्वसमावेशक प्रयत्न करण्यात आले. परंतु, इतर जिल्ह्यांत आत्महत्यांनंतर फक्त शासकीय मदत मिळवून देणे एवढ्यापुरताच शासनाचा हस्तक्षेप मर्यादित दिसतो. या १०० प्रकरणांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबाला निधीरूपी मदत मिळवून देण्यात शासनाची संवेदनशीलता दिसून येते, मात्र त्याचबरोबर आत्महत्यांमागील अन्य कारणे दूर करण्यातली उदासीनताही अधोरेखित होते.

 

बागायती निफाडमध्ये सर्वाधिक, आदिवासी पेठमध्ये शून्य

नाशिक जिल्ह्यातील या १०० आत्महत्यांपैकी सर्वात जास्त आत्महत्या निफाड या सधन आणि बागायती तालुक्यातील आहेत, तर आदिवासीबहुल पेठ तालुक्यात एकही आत्महत्या नाही हे विशेष. यामागील कारणांची मीमांसा...

 

सर्वाधिक आत्महत्या 

- कर्जबाजारीपणा

- उत्पादन खर्च अधिक 

- उत्पन्नाची हमी नाही

- वैयक्तिक विवंचना

- अवकाळी नुकसान

- कौटुंबिक वाद

- मानसिक असंतुलन

- सामाजिक प्रतिष्ठा

- तालुका समित्यांचे घोळ

 

सर्वात कमी आत्महत्या

- आर्थिक विषमता कमी

- सामाजिक प्रतिष्ठेचे अवडंबन नाही

- सर्वाधिक रोजगार हमीची कामे

- वाडी प्रकल्पातून उत्पादनवाढीचे प्रयत्न

- पीक कर्ज अत्यल्प

-जंगल, मासे यातील उत्पन्नाची जोड

 

पुढील स्‍लाइडवर वाचा,  सर्वाधिक आत्महत्या २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राच्या शेतकऱ्यांच्या...

बातम्या आणखी आहेत...