आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपट्टीवाढीविराेधात एकवटला अावाज; विविध पक्ष-संघटनांकडून अांदाेलनाचा पवित्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेने घरपट्टीत ३३ टक्के वाढ केल्याने नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात असून या करवाढीविराेधात गरुवारी (दि. २२) शहरात अांदाेलन व निषेध करण्यात अाला अाहे. पालिकेच्या या निर्णयाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेध करीत महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनसमाेर जाेरदार निदर्शनेही केली. तर मनसेने गांधीनगर येथील घरपट्टी कार्यालयात काळा केक कापून कर्मचाऱ्यांना भरवत या करवाढीचा निषेध केला. विविध पक्ष अाणि संघटनांकडून अांदाेलनाचा इशारा देण्यात अाला अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवार (दि. २३) पासून विभागनिहाय अांदाेलन करण्यात येणार अाहे. 


राष्ट्रवादीचा अाजपासून हल्लाबाेल 
अाधीच करवाढीने पिचलेल्या नागरिकांवर तब्बल ३३ टक्के घरपट्टीवाढीविराेधात राष्ट्रवादी काँग्रेसने अाता विभागनिहाय हल्लाबाेल अांदाेलन करण्याचा पवित्रा घेतला असून, शुक्रवारपासून (दि. २३ ) बिटकाे चाैकातून नाशिकराेड विभागीय कार्यालयावर माेर्चा काढून करवाढ मागे घेण्यासाठी एल्गार पुकारला जाणार अाहे. 


मंगळवारी महासभेत सत्ताधारी भाजपने नाशिककरांवर अठरा वर्षे न झालेली करवाढ एकाच फटक्यात वाढवल्यामुळे विराेधी पक्षांनी अांदाेलन केले हाेते. अाता त्याचे पुढील पाऊल म्हणून राष्ट्रवादीने शहरातील सहाही विभागात माेर्चा काढून नागरिकांच्या उद्रेकाला ताेंड फाेडण्याची रणनीती अवलंबली अाहे. याबाबत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले की, नाशिककर

करवाढीच्या बाेज्याखाली सर्वसामान्य नागरिक दबले अाहेत. ४७५ रुपयांचे गॅस सिलिंडर अाता अाठशे रुपयांना मिळत अाहे. पेट्राेल, डिझेलबाबत बाेलण्याची साेय नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांपासून तर अन्य वर्ग महागाईत दबले असताना अाता शहरातील नागरिकही संकटात अाहे. शहरात चार वर्षांत काेणताही नवीन उद्याेग अाला नसून अाता तर सर्वसामान्यांबराेबरच उद्याेजकांनाही वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सहन करावा लागेल.

 

अन्य शहरांनी करवाढ केल्याचे सांगितले जात असले तरी, मुळात तेथील नागरिकाचे व नाशिककरांचे दरडाेई उत्पन्न यातील तफावत लक्षात घेतली पाहिजे. दरम्यान, राष्ट्रवादीने नाशिककरांच्या उद्रेकाला ताेंड फाेडण्यासाठी विभागनिहाय माेर्चा काढले असून त्याची सांगता महापालिका मुख्यालयावर विराट माेर्चाद्वारे हाेईल, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार यांनी दत्तक नाशिक घेण्याचे अाश्वासन देत सत्ता मिळवणाऱ्या भाजपमुळे झालेली करवाढ अन्यायकारक असून राष्ट्रवादी अापल्या पद्धतीने त्यास उत्तर देईल, असेही स्पष्ट केले. 


असा हाेईल हल्लाबाेल
बिटकाे चाैकातून शुक्रवारी (दि. २३) नाशिकराेड विभागीय कार्यालयावर माेर्चा निघेल. त्यानंतर २७ फेब्रुवारी राेजी नानावली भागातून नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, २८ फेब्रुवारी राेजी सावतानगर, त्रिमूर्ती चाैकातून सिडकाे विभागीय कार्यालय, १ मार्च राेजी पंचवटी कारंजा येथून मखमलाबाद नाका येथे विभागीय कार्यालय, २ मार्च राेजी नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयावर गंगापूरराेडवरून, तर ३ मार्च राेजी सातपूर काॅलनी येथून सातपूर विभागीय कार्यालयावर माेर्चा निघेल. 


शिवसेनेची बस पंक्चर का?
शहराध्यक्ष ठाकरे म्हणाले की, पावणेदाेनशे शहर बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल हाेत असून, त्याविराेधात शिवसेनेचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे स्थानिक शिवसेना पदाधिकारी जाणार असल्याचे वाचनात अाले हाेते. याच पदाधिकाऱ्यांनी विभागीय नियंत्रकांना भेट दिल्यानंतर क्रिसिलने महापालिकेने बससेवा चालवली तर ८० काेटीची तूट येईल असा जाे अहवाल दिला हाेता, ताे सदाेष असून परिवहन महामंडळाला केवळ वार्षिक २४ काेटींचा ताेटा असल्याचे समाेर अाले हाेते. परिवहनमंत्र्यांना भेटून शहर बससेवेचा वास्तववादी अहवाल समाेर अाणू असे सांगणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बस नेमकी काेठे पंक्चर झाली की, केंद्र व राज्यात ज्याप्रमाणे लुटूपुटूची लढाई दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते ताेच पॅटर्न महापालिकेत राबवला जात नाही ना, अशीही खरमरीत टीका ठाकरे यांनी केली. 


मनसेतर्फे गांधीनगरला निषेध 
महापालिकेच्या ३३ टक्के घरपट्टी वाढीच्या निर्णयाच्या विराेधात मनसेने गांधीनगर येथील घरपट्टी कार्यालयात काळा केक कापून निषेध नोंदवला व केक कर्मचाऱ्यांना भरवला. 


यावेळी उपनगर घरपट्टी कार्यालयात उपस्थित मनसे शहर उपाध्यक्ष नितीन साळवे, मनसे शहर चिटणीस नीलेश सहाणे, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, मनविसे शहर चिटणीस संजू जोशी, मध्य विभाग अध्यक्ष कृष्णा नागरे, प्रभाग अध्यक्ष विक्की राजपूत, राहुल शिंपी, हेमंत थापाळे, राहुल गवारे, स्वप्नील शहाणे, रोहित अहिरे, सोनू स्वामी, विशाल पिल्ले, स्वप्नील अहिरे, संकेत शेजवळ व कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...