आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - आई ओरडल्याच्या रागातून घर सोडलेल्या दोन १४ वर्षीय मुलींचा पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेत पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसकाकांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा कधीही घर न सोडता गरीब आई-वडिलांना कामात मदत करून शिक्षण घेत मोठे अधिकारी होण्याची इच्छा दोघींनी व्यक्त केली.
या मुलींना त्यांची अाई घरकामात मदत करत नाही म्हणून आई ओरडली हाेती. त्या रागातूनच त्यांनी घरातून पलायन केले. दोघी नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या. घर सोडल्यानंतर पुन्हा परत घरी जायचे नाही अशी खूणगाठ मनाशी बांधतत दोघींनी रिक्षामधून शालिमार गाठले. घर सोडल्यानंतर एकीने रिक्षावाल्या काकाला विनंती करून त्यांच्या मोबाईलवरून आईला फोन केला व 'मी आता परत कधीच घरी येणार नाही', असे सांगितले. मुलीचा फोन आणि तोही अनोळखी नंबरवरून आल्याने आईच्या मनात विचारांचे काहुर उठले. तिने तडक पोलिस ठाणे गाठत मुलीचे कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेतला. त्याने दोन्ही मुलींना खडकाळी सिग्नलवर सोडल्याचे सांगितले. एक पथक तत्काळ परिसरात दाखल झाले. मात्र, पोलिस वाहन पाहून दोघींनी तेथून पळ काढला.
वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी उपनिरीक्षक प्रवीण बाकले यांना तपासाच्या सूचना दिल्या. बाकले यांनी साध्या वेशात दोन महिला कर्मचाऱ्यांसह परिसरात शोध घेतला. दुपारी २ वाजता दोघी मैत्रिणी एका झाडाखाली भुकेने व्याकुळ स्थितीत बसलेल्या अाढळल्या. दोघींना त्यांनी ताब्यात घेतले. मात्र, 'आम्हाला घरी जायचे नाही', असे सांगत त्यांनी सोबत येण्यास नकार दिला. बाकले यांनी दोघींची अास्थेवाईकपणे चौकशी केली. प्रथम दोघींना पाणी दिले. हॉटेलमध्ये जेवणे दिले. विचारपूस केल्यानंतर समजले की, दोघी शालेय मैत्रिणी आहेत. शाळेला सुट्टी लागल्यानंतर आई-वडील काम करण्यास सांगतात. घरात कोंडमारा होत असल्याने पुन्हा घरी जायचे नाही असे त्यांनी सांगितले. बाकले यांनी दोघींना परिस्थितीची जाणीव करून दिली. आई-वडिलांचे कष्ट, मुली एकटी असल्यानंतर हाेणाऱ्या वाईट घटनांची माहिती दिली. त्यामुळे दोघींनाही केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. निर्भया वाहनातून दोघींना पोलिस आयुक्तालयात आणले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मार्गदर्शन करत दोघींचे समुपदेशन केल्यानंतर दोघींनी शिकून मोठे अधिकारी होण्याची इच्छा बोलून दाखवली. दोघींनाही त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात अाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.