आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका अायुक्त मुंढेंच्या त्रिसूत्रीमुळे महापाैरांसह भाजपमध्येही अस्वस्थता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वर्षभरापूर्वी सत्तेत अालेल्या भाजपने नियमबाह्य कामांचा रतीबच घातल्याचे बघून पारदर्शक कारभाराचा डंका पिटणारे अाणि मुख्य म्हणजे, नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्राेलसाठी अाणलेल्या अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या काेणत्याही कामात गरज, तांत्रिक याेग्यता व व्यवहार्यता तपासूनच पुढे जाण्याच्या त्रिसूत्रीमुळे महापाैरांसह भाजपेयी अस्वस्थ झाले अाहेत. पहिल्याच भेटीत मुंढे यांनी त्रिसूत्रीनेच काम करण्याचा निर्धार व्यक्त करीत मुख्य म्हणजे, तरतूद बघूनच काम करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे भाजपचे नगरसेवक हवालदिल झाल्याचे वृत्त अाहे. 


मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी २०१७ मधील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात नाशिक दत्तक घेत असल्याची घाेषणा केली. पारदर्शकपणे कामकाज करण्याचा प्रचार केल्यामुळे नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच काेणत्या एका पक्षाची बहुमताद्वारे सत्ता अाली व त्याचा पहिला मान भाजपला मिळाला, मात्र सत्तेत अाल्यानंतर पारदर्शकतेला तडा देत भाजपने नियमबाह्य कामांचा सपाटा लावला. महासभेला जणू खेळणेच बनवत पाहिजे त्या पद्धतीने अगदी सभा संपल्यानंतरही जादा विषयात काेटीच्या काेटी उड्डाणे घेणारे प्रस्ताव मंजूर केले गेले. 


महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद अाहे की नाही, कामे हाेणार की निव्वळ दिवास्वप्नच ठरणार याचा काेणताही सारासार विचार केला नाही. परिणामी, विराेधकांनी टीकेची झाेड उठवूनही भाजपला लक्ष्य केले. त्यात, भाजपकडून नियमबाह्य कामांचा सपाटाच नव्हे तर, अंतर्गत कुरबुरी टाेकाला गेल्या. महापालिकेत महापाैर विरूद्ध सभागृहनेते असा संघर्ष सुरू झाला. पुढे ३८ काेटी रुपयांच्या रस्ते डागडुगीच्या प्रस्तावात खुद्द सभागृहनेते दिनकर पाटील यांनीच स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांना पत्र देत भाजपकडून नियमबाह्य कामकाजाला चालना मिळण्याची जाहीर भीती व्यक्त केली. मात्र, पक्षाकडून घरचा अाहेर मिळाल्यानंतर काेणाची तमा न बाळगता विषय मंजूर केला गेला. या सर्वाची मुख्यमंत्री कळत नकळत गंभीर दखल घेत हाेते. याचे पक्षाला भविष्यात गंभीर परिणाम भाेगावे लागतील व मनसेगत अापली अवस्था हाेईल अशी भीती लक्षात घेत त्यांनी कडक शिस्तीचे व सर्वच बाबतीत कठाेर निर्णय घेणाऱ्या मुंडे यांनाच महापालिकेत पाचारण केले. त्यांच्या बदलीमुळे महापालिकेत खासकरून भाजपाचे नगरसेवक अस्वस्थ झाले अाहेत.

 

मुख्यमंत्र्यांनी नेमके पक्षाच्या भल्यासाठी पाठवले की पाय अाेढण्यासाठी असा प्रश्न अाता भाजपचेच नगरसेवक विचारताना दिसत अाहे. अशा परिस्थितीत मुंढे यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर महापाैर रंजना भानसी यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी सभागृहनेते दिनकर पाटील, शहर सुधारणा सभापती भगवान दाेंदे, भाजप गटनेता संभाजी माेरूस्कर, नगरसेविका दीपाली सचिन कुलकर्णी, अनिल भालेराव अादी उपस्थित हाेते. यावेळी महापाैरांनी मुंडे यांचे स्वागत केल्यानंतर महापालिकेच्या कामकाजाविषयी अनाैपचारिक गप्पा रंगल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यात महापाैरांनी भाजपची सत्ता असल्यामुळे विकासकामांना गती कशी मिळेल यादृष्टीने प्रयत्न करण्याची विनंती अायुक्तांनी केली. त्यांनीही ही विनंती सहजपणे मान्य केली, मात्र काेणतेही काम सुचवले तर प्रथमच त्याची लाेकांना गरज अाहे का हे तपासले जाईल. त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या याेग्यता अाहे का अाणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवहार्यता याबाबत काम केले जाईल. या त्रिसूत्रीत जी कामे बसतील तीच हाेतील व त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असली पाहिजे, असेही त्यांनी ठणकावल्याचे वृत्त अाहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील तरतुदीचीच काय परंतु प्रस्ताव तयार न नसताना काेटीच्या काेटी उड्डाणे घेणाऱ्या भाजपची अस्वस्थता वाढली अाहे.


तरतूद नसल्यामुळे २५७ काेटींचे रस्ते रद्द हाेणार 
गेल्या काही वर्षांत अायुक्तांचेच अंदाजपत्रक वास्तववादी ठरले अाहे. स्थायी व महासभेने त्यात काेटीच्या काेटी वाढ केली असली तरी, प्रत्यक्षात त्यातील फारशी कामे हाेऊ शकलेली नाही. मुख्य म्हणजे, मुंढे यांची कार्यपद्धती लक्षात घेत ते अायुक्तांच्याच अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या कामांना भर देण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी अायुक्तांच्या अंदाजपत्रकात तरतूद नसल्यामुळे २५७ काेटी रुपयांचे अंतर्गत रस्ते रद्द करण्याची शक्यता अाहे. अर्थात या कामासाठी महासभेच्या अंदाजपत्रकात तरतूद असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत निविदाही उघडल्या जातील. महासभेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे काम केल्यास पुढील अडचण म्हणजे नियाेजित केलेल्या रस्त्यांची गरज अाहे का हे पटवून देण्याची वेळ येणार अाहे. 


शहरात अाजघडीला जुन्या रस्त्यापेक्षा विकास शुल्क भरून परवानगी घेणाऱ्या अनेक नववसाहतीत साधे मुरूमाचे रस्ते नाही. त्यामुळे गरजेप्रमाणे काम करण्याची भाषा करणारे मुंढे हे जुने रस्ते रद्द करून गरजेप्रमाणे नियाेजन करण्याची शक्यता अाहे. अर्थात त्यातून भाजप दुखावण्याची भीती असून अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांनाही दुखावण्यासारखी बाब असल्यामुळे मुंढे हे अाजवरच्या प्रतिभेप्रमाणे रस्त्यावर फुली मारणार की अन्य काेणता मार्ग काढणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल. 

बातम्या आणखी आहेत...