आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये फूट; श्रेष्ठींचा निर्णय येण्याअाधीच बैठकांचा घाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानपरिषद निवडणुकीत काैल काेणत्या उमेदवाराला द्यायचा याबाबत भाजपने अद्याप वरिष्ठ पातळीवर निर्णय जाहीर न केल्याने अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परस्पर काही उमेदवारांशी हातमिळवणी करीत अंतर्गत बैठका सुरू केल्याचे समजते. त्यातही भाजपमधील एक गट अाघाडीचा, दुसरा गट सेनेच्या तर तिसरा गट अपक्ष उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार न दिलेल्या भाजपमध्येच फूट पडल्याचे चित्र दिसून येत अाहे. 


पालघर लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या विराेधात उमेदवार दिल्याने त्याचा थेट परिणाम नाशिकच्या विधानपरिषद निवडणुकीवर झाला अाहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर पाेटनिवडणुकीसह नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, गेल्या मंगळवारी मध्यरात्रीनंतर बैठक घेऊन शिवसेनेने अापल्याला काठी मारली, त्यास लाठीने उत्तर देऊ' असा संदेश लाेकप्रतिनिधींना दिला. मात्र काेणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहायचे याचा निर्णय १८ ला घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. परंतु, त्या अाधीच भाजपच्या काही स्थानिक लाेकप्रतिनिधींनी अापल्या मनाजाेगत्या उमेदवाराशी हातमिळवणी करीत त्यांचा प्रचारही सुरू केल्याचे समजते. अार्थिक गणितांबराेबरच जाती-पातीची समीकरणे जुळवित उमेदवारांना पाठिंबा दर्शविला जात अाहे. गुरुवारी (दि. १७) सायंकाळीही भाजपच्या एका बड्या नेत्याने अापल्या निवासस्थानी काही लाेकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यात विशिष्ट उमेदवाराला मदत करण्याची सूचना लाेकप्रतिनिधींना दिली. या बैठकीला निवडक लाेकप्रतिनिधी उपलब्ध हाेते. भाजपमधील एक गट अाघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचेही कळते. 


वरिष्ठांचा काहीही निर्णय अाला तरी अाम्ही उमेदवार बदलणार नाही, असा पवित्रा घेत या गटाने थेट पक्षालाच अाव्हान दिले अाहे. तर तिसरा एक गट अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी अाहे. या उमेदवारासाठी हा गट श्रेष्ठींच्या संपर्कात अाहेच; शिवाय त्याच्या बाजूने मते वळविण्यासाठी मतदारांना संपर्कही करीत असल्याचे बाेलले जाते. 


सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी, अाघाडी अाज जाणार सहलीला 
विधानपरिषद निवडणुकीला अवघे चारच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी अंतिम माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. भाजपने अद्यापपर्यंत काेणाला मतदान करणार याचे पत्ते खुले केले नसल्याने तिघे उमेदवार या पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात अाहेत. दुसरीकडे खबरदारीची उपाययाेजना म्हणून शिवसेनेने अापल्या सदस्यांना मुंबईतील एका ठिकाणी लपविले अाहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी अाघाडीचे सदस्य शुक्रवारी (दि. १८) अज्ञातस्थळी रवाना हाेत अाहेत. येत्या २१ मे राेजी विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान हाेत अाहे. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, काँग्रेस-राष्ट्रवादी अाणि मित्रपक्ष अाघाडीकडून अॅड. शिवाजी सहाणे तर अपक्ष परवेज काेकणी हे या निवडणुकीसाठी नशीब अजमावत अाहेत. 


निवडणुकीत मतदारांची फाटाफूट टाळण्यासाठी सुरक्षिततेची उपाययाेजना म्हणून शिवसेनेने सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केले अाहेत. हे करताना संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेचे सदस्य एकाच ठिकाणी न पाठविण्याची रणनीती अवलंबिण्यात अाली अाहे. एका ठिकाणी सदस्यांची गर्दी केल्यास त्यातून सगळ्यांकडे लक्ष देणे अवघड हाेण्याच्या शक्यतेने नगरसेवकांना मुंबईत एका ठिकाणी तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना दुसऱ्या ठिकाणी, तसेच नगरपालिका, पंचायत समिती या सदस्यांना अन्य ठिकाणी ठेवण्यात अाले अाहे. प्रत्येक गटाची जबाबदारी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात अाली अाहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून अॅड. सहाणे यांनीही काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह अन्य मित्रपक्षांच्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलविण्याचे नियाेजन सुरू केले अाहे. येत्या शुक्रवारी (दि. १८) हे सदस्य महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील पर्यटनस्थळी जातील. 


सुट्टीची 'चकटफू' माैज 
उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने पर्यटनस्थळी फिरण्याचे नियाेजन बहुतांश कुटुंबांचे सुरू अाहे. त्यातच विधानपरिषद निवडणुकीनिमित्ताने अशा पर्यटनस्थळांची सहकुटुंब 'चकटफू' सहल हाेत असल्याने मतदारांसह त्यांचे कुटुंबीयही खुश असल्याचे चित्र अाहे. 


भाजपचे सदस्य खट्टू 
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काेणाबराेबर रहायचे याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने या पक्षाच्या सदस्यांना सहलीसाठी जाता अाले नाही. त्यामुळे बहुतांश सदस्य खट्टू अाहेत. वरिष्ठांनी तातडीने निर्णय घेतल्यास एक सहल तरी फुकटात सुटून जाईल, अशी प्रतिक्रिया एका सदस्याने गुपचूप अाणि तेही नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 

बातम्या आणखी आहेत...