आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या रहस्यमयी भूमिकेमुळे चुरस; पक्षांतील फाटाफुटीने अटीतटीची लढत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पालघर लाेकसभा निवडणुकीतील गद्दारीचा बदला घेण्यासाठी नाशिक विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपने कथितरित्या राष्ट्रवादी महाअाघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे निराेप नगरसेवक वा मतदारांना दिले असले, तरी प्रत्यक्षात पक्षादेश अर्थातच व्हीप न बजावल्यामुळे किंबहुना ताेंडी दिलेले अादेश, त्याबराेबरच शिवसेनेकडून ज्या पद्धतीने मायेने विचारपूस झाली त्याप्रमाणे महाअाघाडीकडून वागणूक न मिळाल्याची रूखरूख, त्याचा परिणाम म्हणून साेमवारी भाजपतील दाेन गटांची विरुद्ध दिशेची ताेंडे बघता एकगठ्ठा मते काेणा एकाला पडेल अशी शक्यता मावळली अाहे. दुसरीकडे, अायात उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांच्याविषयीच्या नाराजीमुळे शिवसेनेत उभी फूट पडेल अशी परिस्थिती असताना अशाच स्वरूपाची धुसफूस व त्यातून दाेन गट पडल्याचे चित्र राष्ट्रवादी, काँग्रेसमध्येही बघायला मिळाल्यामुळे अटीतटीची लढत झाली अाहे. 


मालेगावसारख्या मुस्लीमबहुल मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेस अाघाडी घेईल असे चित्र असताना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाराज अपक्ष उमेदवार परवेज काेकणी यांच्यासह स्थानिक अामदारांच्या मदतीने जाेरदार ताकद लावल्यामुळे हा तालुका अाता निर्णायक ठरणार अाहे. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीसह महाअाघाडीकडून शिवाजी सहाणे व अपक्ष परवेज काेकणी यांच्यातील तिरंगी सामना मतदानाच्या दिवशी दुरंगी झाला. मतदानाच्या पूर्वसंध्येला तटस्थ असणाऱ्या भाजपकडून हाॅटेल ज्युपिटर येथे मुक्कामी असलेल्या नगरसेवक तसेच मतदारांना ताेंडी अादेशाद्वारे सहाणे यांना चाल देण्याचा निराेप अाला. त्यामुळे राष्ट्रवादीसह महाअाघाडीचे बळ वाढल्याचे चित्र हाेते. रविवारी मध्यरात्री सहाणे यांनी भाजपच्या मुक्कामस्थळी हजेरी लावत सर्वांनाच 'वंदनही' केले. मात्र, सहाणे यांना समर्थन देण्यावरून जाेरदार मतभेद सुरू झाले. 

 

शिवसेनेची जिरवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच राष्ट्रवादीसाेबत जाण्याचा अादेश दिल्याचे काळकर यांनी ठणकावून सांगितले. मात्र, स्थानिक पातळीवर निवडणुकीला लागलेला जातीय रंग तसेच लक्ष्मीदर्शनाच्या खेळामुळे भाजप काेणाच्या पाठीशी एकसंघ उभा न राहिल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात दाेन भिन्न गटांत विखुरलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे दिसत हाेते. त्यात लक्ष्मीदर्शनाच्या प्रयाेगात अापल्यावर 'अन्याय' झाल्याची भावना बाेलून दाखवत पालकमंत्र्यांना निराेप द्यायचा असल्यामुळे नंतर मतदान करताे असे सांगत अनेक नगरसेवक बराच वेळ अडून बसले हाेते. त्यांची समजूत काढून मतदानासाठी पाठवण्याची कसरत पालिकेतील सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी माेरूस्कर हे करीत हाेते. सर्वात प्रथम भाजपच्या नगरसेवकांचे मतदान अाटाेपल्यानंतर शिवसेनेचे महापालिकेतील नगरसेवक मतदार दाखल झाले. 


संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरी यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बिडवे यांनी प्रथम महापालिकेतील नगरसेवकांकडून मतदान करून घेतले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी भगूर, देवळाली कॅन्टाेमेन्ट बाेर्ड येथील शिवसेनेच्या मतदारांना पाचारण केले हाेते. दुपारी २ वाजेनंतर राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, अपक्ष मतदार एकत्रितरित्या दाखल झाले. दरम्यान, भाजपची भूमिका अाता निर्णायक ठरणार असून त्यांच्याकडून सहाणे यांना ७० टक्के चाल मिळाली व शिवसेनेतील किमान नाराज ३० टक्क्यांहून अधिक सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर निर्णायक नाशिक तहसील क्षेत्रात महाअाघाडीला बुस्ट मिळू शकते. भाजपकडून किमान ५० टक्के अाघाडी मिळाली व मालेगावसह अन्य तालुक्यातील अाघाडीवर दराडे यांच्या विजयाचे समीकरण सांगितले जात अाहे. 


नाराज काेकणींची मालेगावी उघड भूमिका 
भाजपने फसवणूक केल्यामुळे नाराज असलेल्या काेकणी यांनी साेमवारी उघडपणे दराडे यांच्या प्रचारासाठी झाेकून दिले. मालेगावमधील बहुसंख्य मुस्लिम मतदारांकडे वैयक्तिक स्वरूपात जात अापल्यावरील अन्यायाची कैफियत मांडत दराडे यांना समर्थन देण्यासाठी प्रयत्न केले. काेकणी यांच्याप्रमाणेच जिल्हा बँकेतील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी चांदवड, देवळा, बागलाण या तालुक्यात दराडे यांच्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा अाहे. 


हे फॅक्टर निर्णायक 
- अार्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली निवडणूक यंदा थेट मराठा विरुद्ध अाेबीसी किंबहुना अन्य अशाच प्रकारात विभागली गेल्याचे उघड दिसत हाेते. 
- त्याचा परिणाम म्हणून भाजपचा अाघाडीला पाठिंबा असताना दाेन गट बघायला मिळाले. 
- लक्ष्मीदर्शनात विराेधकांना झुकते माप व हक्काचे वाऱ्यावर यामुळे शिवसेनेत मतदानाच्या दिवशी दुपारनंतर धुसफूस चालली. 
- शहरी भागात तुलनेत सहाणे यांना तर ग्रामीणमध्ये दराडे यांना अाघाडी मिळाल्याचा सूर हाेता. 
- काँग्रेस अाघाडीसाठी जमेचा असलेला मालेगाव फॅक्टर दुपारनंतर शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याच्या चर्चेमुळे रंगत वाढली 

बातम्या आणखी आहेत...