आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जकात’मधून 1020 गरीब विद्यार्थ्यांना 1 कोटीची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील संपन्न व दानशूर व्यक्तींकडून करण्यात येणाऱ्या जकात दानातून १०२० गरजू विद्यार्थ्यांना अातापर्यंत एक कोटी ५ लाख रुपयांची मदत करण्यात अाली अाहे. जकातीचा विनियोग शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्याचा अनाेखा उपक्रम आयेशा बैतुलमाल अर्थात आयेशा वेल्फेअर अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या नऊ वर्षांपासून करीत अाहे.

 

गेल्यावर्षी संस्थेने जकात दानातून २४ लाख ५८ हजार ८६१ रुपये जमा करत २२७ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिले. यंदाच्या रमजान महिन्यात ५० लाख रुपये जकात मिळवून ती विद्यार्थ्यांपर्यंत पाेहाेचवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात अाले अाहे.
केवळ पैसे नसल्यामुळे समाजातील कोणीही शिक्षणापासून किंवा उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच समाजातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आयेशा ट्रस्ट संस्था कार्यरत अाहे. इस्लाम धर्माच्या मूलभूत तत्त्वांचा अाधार घेऊन दानाचा लाभ खऱ्या अर्थाने अधिक चांगल्याप्रकारे व्हावा या उद्देशानेच या उपक्रमाला प्रारंभ करण्यात अाला. मुस्लिम बांधवांचा त्याला वाढता प्रतिसाद लाभत अाहे. 


विशेष म्हणजे, आतापर्यंत उच्च शिक्षणासाठी मदत केलेल्या १०२० गरीब विद्यार्थ्यांपैकी तब्बल २०० विद्यार्थी स्वत:ही संस्थेला जकातच्या माध्यमातून आर्थिक मदत करत आहेत. ‘जकात’च्या मदतीने शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांमधील काही 
विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली असून, काही विद्यार्थी तर परदेशात नोकरी करत आहेत.

 

इस्लामच्या ५ मूलतत्त्वांतील एक जकात

इस्लाम धर्म ज्या पाच मूलतत्त्वांवर आधारित आहे, त्यापैकी एक तत्त्व जकात होय. समाजातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी वर्षातून एकदा धनिक मुस्लिमाने त्याच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीच्या शेकडा अडीच टक्के या हिशेबाने जकात आर्थिक स्वरूपात काढून ती गोरगरिबांत वाटप करणे धर्माने अनिवार्य केले असल्याने धनिक मुस्लिम बांधव रमजान महिन्यात अधिक पुण्यप्राप्ती लाभते म्हणून खासकरून या महिन्यात आर्थिक स्वरूपात जकात वाटप करतात. मुस्लिम समाजात साक्षरतेचे प्रमाण तुलनेने कमी असून, अार्थिक चणचण व पेचात सापडलेल्या मुस्लिम समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शुल्काअभावी पुढील उच्च शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे समोर ठेवून संस्थेने पुढाकार घेत जकात दानातून मिळालेला पैसा हा धार्मिक बाबींवर न खर्च करता ते शिक्षणाची द्वारे खुले करण्यावर खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने आता समाजात शैक्षणिक क्रांती घडण्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होत आहेत.

 

‘मिशन २०२२’मधून प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांपर्यंत
महाविद्यालयातील भरमसाट शैक्षणिक शुल्काअभावी पुढील उच्च शिक्षण घेणे दुरापास्त होत असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ती एक मोलाची मदत ठरत आहे. ‘आयेशा’ने रमजान महिन्यात जमा झालेली जकात दानाच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमातून हे शक्य होत आहे. तसेच, संस्थेने ‘मिशन २०२२’ अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत सन २०२२ पर्यंत समाजातील प्रत्येक गाेरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत अशी मदत पाेहाेचवण्याचा संस्थेचा प्रयास राहणार अाहे.

 

‘जकात’च्या पैशांतून जीवनाचे कल्याण

‘शिक्षण सर्वात सामर्थ्यवान शस्त्र आहे, हे आपले जग बदलू शकते’ हा संदेश घेऊन आम्ही सन २००९ पासून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ‘जकात’ची रक्कम देत आहाेत. शेकडाे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे यातून कल्याण झाले अाहे. 
अॅड. एम. टी. क्यू. सय्यद, अध्यक्ष, आयेशा वेल्फेअर अँड चॅरिटेबल ट्रस्ट

बातम्या आणखी आहेत...