आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगावला कांदा दरात क्विंटलला 550 रुपयांची वाढ; निर्यातमूल्य शून्य केल्यामुळे परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकराेड / लासलगाव- कांद्यावरील किमान निर्यातमूल्य शून्य करताच कांदा तेजीच्या लाटेवर स्वार होऊ लागला आहे. परिणामी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात ५५० रुपयांची वाढ झाली आहे. 

 

वाणिज्य मंत्रालयाने २ फेब्रुवारी २०१८ रोजी कांद्याचे निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर ५ फेब्रुवारीला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या भावात ५५० रुपयांची तेजी बघायला मिळली. गेल्या काही दिवसात आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरत हाेते. त्यावर अाळा घालण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातशुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. 


गेल्या आठवडाभरात १४०० रुपयांनी गडगडलेले कांदा भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यातीस चालना देण्यासाठी किमान निर्यातमूल्य शुन्यावर आणले. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटलला सरासरी २८०० रुपयांवर असणारे भाव १४०० रुपयांपर्यंत खाली उतरले हाेते. आठ दिवसांमध्ये कांद्याचे दर पन्नास टक्क्यांहून अधिक उतरल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सरकारने तत्काळ किमान निर्यातमूल्य हटविल्याने कांदा निर्यात खुली झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दरांमध्ये ५५० रुपयांची वाढ झाल्याची नोंद लासलगाव समितीत झाली. लासलगावला ६९२ वाहनांतून १०२८४ क्विंटल आवक होऊन कमीतकमी ९०१ अाणि जास्तीत जास्त २५३६ भाव मिळाला. 


कांदा विक्रीची घाई करायला नकाे 
कांद्याचे निर्यातमूल्य शून्य झाल्यानंतर कांद्याच्या भावात चांगल्या प्रमाणात सुधारणा होऊ लागली आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. अनेक वर्ष तोट्यात कांदा विक्री करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना यानिमित्ताने दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई न करता प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा. जेणेकरून चांगले भाव मिळू शकतील. 
- जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती 

बातम्या आणखी आहेत...