आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यावरील किमान निर्यातमूल्य पूर्णपणे रद्द; देशांतर्गत बाजारपेठेतील दर नियंत्रणासाठी उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य पूर्णपणे रद्द करण्याची घाेषणा केली अाहे. यापूर्वी १९ जानेवारी राेजी देशांतर्गत बाजारपेठेतील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे मूल्य ८०० एेवजी ७५० डाॅलरपर्यंत कमी केले हाेते. त्याच वेळी फेब्रुवारीत त्याचा फेरअाढावा घेण्यात येईल, असे जाहीर केले हाेते. अाता स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात अाल्यामुळे व अावक वाढल्यामुळे निर्यातमूल्य पूर्ण रद्द करण्याची घाेषणा शुक्रवारी सायंकाळी  करण्यात अाली. त्यामुळे स्पर्धात्मक दराने निर्यात करणे शक्य हाेईल. चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगले दर मिळतील. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अाहे.   

 

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अागामी निवडणुका लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी लगेच कांद्यावरील निर्यातमूल्य रद्द करून सरकारने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिल्याचे मानले जात अाहे. वाणिज्य मंत्रालयाने २ फेब्रुवारी राेजी जारी केलेल्या अधिसूचनेत नियमांमध्ये सुधारणा केल्याचे अाणि पुढील सूचना जारी हाेईपर्यंत कांदा निर्यातमूल्य रद्द केल्याचे म्हटले अाहे. 

 

योग्य वेळी निर्णय  
देशांतर्गत कांदा बाजारपेठेत दाखल होत आला असताना निर्यातमूल्याचे दर ७०० डाॅलर होते. त्यामुळे निर्यात पाहिजे त्या प्रमाणावर होत नव्हती. आता ते रद्द झाल्याने त्याचा थेट फायदा कांदा उत्पादकांना व निर्यातदारांना होणार आहे. निर्यात मोठ्या प्रमाणात होऊन कांद्याचे दर वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. केंद्र सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असे म्हणता येईल.  
- नितीन जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव 

 

अतिशय सुखद धक्का  
गुरुवारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना हमीभावासाठी तरतूद केल्याची माहिती वाचण्यात आली. आज कांद्याचे निर्यातमूल्य शून्य केल्याने त्याचा फायदा शेतीमालाला दर मिळण्यात होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत सुमारे दीड हजार रुपयांनी कांद्याच्या भावात घसरण झाली होती. आता कांद्याचे भाव पुन्हा तेजीत येतील, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी  सुखद धक्का सरकारने दिला अाहे. 
- सोमनाथ निलख, शेतकरी, देवगाव  

बातम्या आणखी आहेत...