आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा-नाशिकचे पाणी शहापूरला वळवण्याचा घाट; सिंचनावर परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सातत्याने पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातील वैजापूर अाणि गंगापूर या ठिकाणी पाणी पुरवण्याचा महत्त्वाचा स्त्रोत असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे पाणी शहापूरला वळवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला अाहे. मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा घाेट काढून ताे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ९७ टँकरग्रस्त गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेद्वारे देण्याचा घाट घातला गेला अाहे. यासाठी भावली धरणातून शहापूरला १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे. विशेष म्हणजे, तुटीचे खाेरे समजल्या जाणाऱ्या गाेदावरी खाेऱ्यातून हे पाणी मुळातच अतिरिक्त पाणी उपलब्ध असलेल्या भातसा खाेऱ्याकडे वळविले जात असल्याने मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्यासह नाशिकच्या सिंचनावरही याचा परिणाम हाेणार अाहे. 


भावली धरणाची सध्याची साठवण क्षमता १५०० दशलक्ष घनमीटर अाहे. यापैकी मराठवाड्यातील गंगापूर अाणि वैजापूर या तालुक्यांना पिण्याचे पाणी मिळावे याकरिता एक्स्प्रेस कॅनाॅलद्वारे पाणी दिले जाते. नाशिक जिल्ह्यातील सिंचनासाठी १०० दशलक्ष घनफूट पाणी वापरले जाते. 


मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करीत मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या या निर्णयानुसार भावली धरणातून आता १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूर तालुक्यातील गावांना दिले जाणार अाहे. साहजिकच ही तूट थेट मराठवाड्याला जाणवणार असल्याने या निर्णयाला कडाडून विराेध हाेण्याची चिन्हे अाहेत. 


वीजबिल वाचविण्यासाठी अट्टाहास 
भावली धरणातून शहापूर तालुक्यातील संबंधित गावांना पाणीपुरवठा जलवाहिनीद्वारे केला जाणार अाहे, भावलीपासून थेट शहापूरकडे उतार असल्याने पाणी उचलण्याचा अाणि त्याकरिता विजेचा वापर करण्याची वेळ येणार नाही. अाजूबाजूला भरपूर पाणी उपलब्ध असतानाही केवळ वीजबिलाचा खर्च वाचविण्यासाठी भावलीचे पाणी अशा पद्धतीने वळविण्याचा सरकारचा हा प्रयत्न हास्यापद असल्याची टीका अाता सुरू झाली अाहे. 


नाशिकचे पाणी पळविण्याचे सातत्याने प्रयत्न 
यापूर्वी दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यात पडणारे पावसाचे पाणी गुजरातकडे वळविण्याचे प्रयत्न उघड झाले हाेते. तर केवळ नाशिकमध्ये पाणी उपलब्ध नसल्याचा अहवाल दिला गेल्याने नाशिकमध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेर हाेऊ शकत नसल्याचा निर्णय झाल्याचे समाेर अाले हाेते. त्यानंतर अाता थेट नाशिकच्या सिंचनाला फटका बसेल अशाप्रकारचा शहापूरकडे पाणी वळविण्याचा निर्णय घेतला गेल्याने या प्रश्नाची धग वाढणार असे चित्र अाहे. 

बातम्या आणखी आहेत...