आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेला शह देण्यासाठी नाशिकमधून भाजप ‘राणे अस्त्र’ वापरण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने तब्बल १४ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जवळपास पाेहाेचण्यात भाजपला यश अाले अाहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप अाता नारायण राणे यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याची चाल खेळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात अाहे. राणेंचा नाशिकच्या राजकारणात प्रवेश झाला तर यानिमित्ताने गजाअाड असलेल्या छगन भुजबळांनाही भविष्यात जम बसवण्यास कसरत करावी लागेल, असे बाेलले जात अाहे. येत्या पाच महिन्यांत विधानपरिषदेची निवडणूक हाेणार अाहे. यासाठी मतदारांचे संख्याबळ सर्वाधिक असलेल्या शिवसेना अाणि दुसऱ्या क्रमांकाच्या भाजपने माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. 


इगतपुरीत १३ अाणि त्र्यंबकमध्ये दाेन उमेदवार निवडून अाल्यामुळे विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे संख्याबळ अाता १९० इतके झाले अाहे. तर त्र्यंबकमध्ये १४ अाणि इगतपुरीत उमेदवार निवडून अाल्याने भाजपचे संख्याबळ अाता १५६ पर्यंत पाेहाेचले अाहे. काँग्रेस अाणि राष्ट्रवादीचे अनुक्रमे ५८ अाणि ९१ असे संख्याबळ अाहे. माकप मनसेसह अन्य ७९ सदस्य अाहेत. हे सदस्य निवडणुकीत निर्णायक भूमिका वठवू शकतात. सद्यस्थितीत शिवसेनेचे पारडे जड दिसत असले तरी शिवसेना अाणि भाजपमध्ये अवघ्या ३४ मतांचा फरक असल्याने भाजपही बलाढ्य उमेदवाराच्या शाेधात अाहे. अशात नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यास अन्य पक्षांची मते खेचण्यातही यश मिळू शकते अशी अाशा बाळगत राणे यांच्या नावावर भाजप शिक्कामाेर्तब करू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा अाहे. 


बाहेरून अालेल्यांना नाशिकचा अाश्रय
बाहेरूनअालेल्या उमेदवाराला अामदारकी देण्याची परंपरा नाशिकमध्ये जुनी अाहे. यापूर्वी यशवंतराव चव्हाण, छगन भुजबळ यांनाही उमेदवारी देऊन मंत्रिपद देण्यात अाले हाेते. हीच परंपरा राणेंच्या बाबतीत पुढे चालविण्यात अाली तर त्यात नवल वाटू नये. 


माेठ्या राजकीय नेतृत्वाची नाशिककरांनाही प्रतीक्षा
छगनभुजबळांना तुरुंगात टाकण्यात अाल्यानंतर नाशिक जिल्ह्याला प्रभावी राजकीय नेतृत्वच राहिले नसल्याचे भावना जिल्हावासीयांची अाहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अापण नाशिक दत्तक घेत असल्याची घाेषणा केली हाेती. मात्र त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे पुरेसे लक्षच दिल्याने नाशिकला माेठे नेतृत्व लाभावे, जेणेकरून जिल्ह्याचा विकास हाेईल, अशीही अपेक्षा अाता व्यक्त हाेत अाहे. 


...तर भाजप घेईल सेनेशी ‘पंगा’ 
नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नसला तरीही त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने राष्ट्रीय लाेकशाही अाघाडीला पाठिंबा दिला अाहे. त्यामुळे अागामी काळात भाजपच्या वतीने राणेंना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता अाहे. मात्र, राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा इशारा यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी दिला असल्यामुळे सध्यातरी भाजप राणेंच्या बाबतीत ‘बॅकफूट’वर अाहे. मात्र, एेनवेळी नाशिक विधानपरिषदेत राणेंना उमेदवारी देऊन भाजप सेनेशी ‘पंगा’ घेऊ शकते, अशीही चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरू अाहे. 


अजून तसा विचार नाही : राणे 
‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला असता, नाशिकमधून उमेदवारी करण्याबाबत केवळ चर्चा असून यासंदर्भात मी काेणताही विचार केलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...