आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी करणारी नवखी टोळी जेरबंद, तब्बल 15 घरफोड्या उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंबड, इंदिरानगर परिसरात १५ घरफोड्या करणारी नवख्या गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यास मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटला यश आले आहे. याप्रकरणी चार घरफोड्यांना अटक करण्यात आली असून, सोने खरेदी करणाऱ्या सराफास ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही टोळी दिवसा रेकी करून रात्री घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 


याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१७ मध्ये १४ घरफोडींचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना सेंट्रल युनिटच्या कर्मचाऱ्यांना एक संशयित अश्विननगर, पाथर्डी फाटा रात्री संशयास्पद फिरताना अाढळला. त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. गोटीराम ऊर्फ गोट्या लक्ष्मण भोये (रा. चुंचाळे, अंबड) असे नाव त्याने सांगितले. अंगझडतीमध्ये स्क्रू ड्रायव्हर मिळून आला. अधिक चौकशीत चार जणांची टो‌ळी घरफोडी करत असल्याची माहिती 'गोट्या'ने दिली. पथकाने चुंचाळे शिवारात कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुरुदेव काळू खतेले, सागर आत्माराम जमदाडे, ऋषिकेश अशोक राजगिरे (तिघे रा. चुंचाळे) यांना अटक करण्यात आली. चौघांच्या चौकशीत अंबड परिसरात १४ आणि इंदिरानगर येथे एक अशा १५ घरफोड्या केल्याची कबुली दिली. 


घरझडतीमध्ये १६८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८०० ग्रॅम चांदी, चार लॅपटॉप, दाेन कॅमेरा आणि रक्कम असा सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी, सचिन सावंत, भीमराव गायकवाड, शंकर गोसावी, भीमा कर्डिले, राजेश गवळी, गंगाधर केदार, संजय गामणे, आत्माराम रेवगडे, दीपक दिवटे, रेखा गायकवाड, दीपिका पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे उपआयुक्त विजय मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी पथकाचे अभिनंदन केले. संशयित टोळीकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती उपआयुक्त मगर यांनी दिली. 


चोरीच्या वस्तूंची विक्री
संशयित घरफोडीत चोरी केलेल्या वस्तू ट्रकटर्मिनल्स येथील ट्रकचालकांना विक्री करत असत. या पैशाने मौजमजा करत होते. तर काही दागिने घरात ठेवले होते. पैसे संपल्यानंतर विक्री करणार असल्याचेही संशयितांनी पोलिसांना सांगितले. संशयितांनी घरफोडीत चोरी केलेले सोन्याचे दागिने सराफ बाजारातील एका सराफाला विक्री केले होते. पथकाने या सराफालाही ताब्यात घेतले आहे. 


भिकारी अवतार आणि नशा केल्याची शक्कल 
संशयित घरफोडीचे नियोजन करताना पोलिस गस्तीमध्ये पकडले जाऊ नये याकरिता मळकट कपडे, गांजा पिऊन नशेत असल्याचे भासवत होते. अंबड पोलिसांच्या गस्त पथकाने या टोळीतील दोघांना पकडले होते. मात्र, अंगावरील मळकट पेहराव बघून पोलिसांना हे फिरस्त अथवा भिकारी असल्याने समज देऊन सोडून दिले असल्याची माहिती खुद्द संशयितांनी पोलिसांना दिली. रात्री ११ वाजता दोन-दोनच्या गटाने जाऊन चोरी करत होते. 


रेकी करून घरफोड्या 
संशयित टोळी दिवसा परिसरात रेकी करून रात्री घरफोडी करत होती. चौघे दोन गटांत विभागून रेकी केलेली बंद घरात चोरी करत होते. चोरी करताना दरवाजाच्या कडीकोयंडा आणि कुलूप स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तोडून घरात प्रवेश करून कपाट कटवणीच्या साह्याने तोडून चोरी करत होते. 'गोट्या'ने नवीनच टोळी स्थापन करत पंधरा घरफोड्या सराईत गुन्हेगारांना लाजवेल असे गुन्हे केल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...