आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेवला- तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते यादवराव (बाबा) चंद्रराव देशमुख (७५) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. मंगळवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समाजसेवी राजकारणाची आवड असलेल्या बाबांनी सदैव गोरगरीब व सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समस्यांच्या निराकरणासाठी अहोरात्र याेगदान दिले होते. समाजासाठी झोकून देणाऱ्या देशमुख यांच्या पार्थिवावर तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळचे दिंडोरी तालुक्यातील नळवाडेपाडा गावचे सुपुत्र असलेल्या यादवराव देशमुख यांची वडिलोपार्जित जमीन करंजवण धरणात गेली होती. त्यामुळे ४० वर्षांपूर्वी पिंपळगाव जलाल येथे स्थलांतरित झाले होते. तत्पूर्वी त्यांनी दिंडोरी पंचायत समितीचे सदस्यपददेखील भूषविले होते. पिंपळगाव जलाल येथे स्थायिक झाल्यानंतरच्या बाबांनी सार्वजनिक कामांचा ध्यास सोडला नाही. कुसमाडी, पिंपळगाव जलाल गेट खुले व्हावे, यासाठीचे आंदोलन, पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा, पालखेडच्या पाण्यासाठी आंदोलनासह तळागाळातील माणसांचे प्रश्न यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग होता.
वयाची सत्तरी पार केल्यानंतरही जनतेच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी त्यांची नेहमी धावपळ दिसत हाेती. पूर्वाश्रमीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या बाबांचा नंतरच्या काळात जनता दल व पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा प्रवास झाला. सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
सार्वजनिक कामांचा ध्यास घेऊन आयुष्यभर धडपडणाऱ्या या मनमिळावू नेत्याच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी पिंपळगाव जलाल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी तसेच नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले होती. यादवराव देशमुख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे येवला तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख यांचे ते वडील होत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.