आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोड - वयाच्या चौथ्या वर्षीच वाहनचालकाने अनैसर्गिक बलात्कार केल्याने 'त्या' बालकाच्या मनावर परिणाम हाेऊन त्याचे शौचावर नियंत्रणच राहिले नव्हते...चाळीतील ६२ वर्षांचा वृद्ध रोज 'त्या' मुलीचा विनयभंग करीत असल्याने प्रचंड दबावाखाली घराबाहेर न पडणेच तिने पसंत केलेले... अशा सुमारे १६० लैंगिक शोषण झालेल्या बालकांपैकी ४८ जणांच्या मनातून भीती घालवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले आहे. नाशिकरोड येथील शोभा पवार-साळवे यांनी.
बाल लैंगिक शोषणाविरोधात राज्यभर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पोलिस यांना मोफत समुपदेशन करून बालकांच्या मनातून भीती काढून त्यांना पूर्ववत स्थितीवर आणण्याचे काम १८ वर्षांपासून त्या करीत आहेत.
पवार यांनी सांगितले की, लहान मुलांवर बलत्कार होणे म्हणजेच लैंगिक शोषण समजले जाते. मात्र, लहान मुलांच्या किंवा मुलींच्या अवयवांना हात लावणे, त्यांना अश्लील फोटो-चित्रपट दाखविणे, अश्लील चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून काम करून घेणे हेही बाल अत्याचारामध्ये येते. मात्र, अद्यापही समाज लहान मुलांसोबत संवाद साधत नाही. त्यांना कान, नाक, डोळा, डोके, हात, पाय हे शिकवितात; मात्र लिंगाबाबत त्यांना अजाण ठेवतात. कान, नाक, डोळे, हात, पाय स्वच्छ करण्यासाठी आई-वडील त्या लहान मुलांना शिकवितात, मात्र लहान मुलांना त्यांचे शिश्न व मुलींना त्यांची योनी स्वच्छ करण्याबाबत शिकवित नाहीत. लहान मुलांना त्यांच्या या अवयवांना काही आजार झाल्यास ते आई-वडिलांना सांगत नाही. तो आजार नंतर वाढतो. त्यासाठी पालकांनी मुलांसोबत मैत्रीचे संबंध ठेवावेत. जेणेकरून बाहेरील व्यक्तींनी लैंगिक शोषण केल्यास ते पालकांना त्वरित सांगतील. सध्या १० पैकी ६ मुलांचे लैंगिक शोषण होते. त्यामध्ये ६ पैकी २ मुलींचे प्रमाण असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, बाल लैंगिक शोषण पुरुषच करतात असे नाही तर महिलाही लैंगिक शोषण करीत असल्याचे पवार यांनी सांगितले. हे अत्याचार थांबविण्यासाठी प्रत्येकाने डोळसपणे मुलांना मुक्त होऊ देण्याची गरज आहे. आतापर्यंत पुणे, बुलडाणा, बीड, परभणी, मुंबई, नागपूर, जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक यासह ग्रामीण भागात शिक्षक, पालक व पोलिसांचे मेळावे घेऊन याबाबत जागृती केली जात अाहे.
कार्यासाठी पती रमेश साळवेंची बहुमोल साथ
पती रमेश साळवे यांनी समाजाच्या हितासाठी मला या कामात प्राेत्साहनच दिले अाहे. तसेच मुलगा सुगत हादेखील या कार्यात मदत करीत असतो. माझे वडील छगन पवार अशिक्षित असूनही त्यांनी समाजाची गरज ओळखून कार्य करण्याची शिकवण दिली. त्यामुळे मी याच विषयामध्ये आता पीएचडी करीत आहे.
- शोभा पवार, सामाजिक कार्यकर्त्या
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.