आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी महामंडळाचा टोल फ्री क्रमांक ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’; हेल्पलाइन फक्त नावालाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता यावी तसेच एसटी बसेस आणि त्यांच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांना योग्य ती माहिती मिळावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मोठा गाजावाजा करत कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना संपर्क करता यावा यासाठी १८००२२१२५० हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या टोल फ्री क्रमांकावर कॉल लावल्यानंतर संपर्कच होत नसल्याच्या शेकडो प्रवाशांच्या तक्रारी अाहेत. 

 

एसटी महामंडळाच्या वतीने खासगी प्रवासी वाहतुकीसोबत स्पर्धा करताना विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत. राज्यात विविध मार्गांवर तसेच खेडोपाडी एसटी बसेस रोजच नित्यनियमाने धावत असतात. या बसेस तसेच वेळापत्रकाबाबत एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी, याचबरोबर प्रवाशांना येणाऱ्या अडचणींची अथवा आपत्कालीन वेळी तातडीने मदत मिळावी या उद्देशाने या कॉल सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.   प्रवाशांच्या अडचणी तसेच सूचनादेखील कॉल सेंटरच्या माध्यमाने स्वीकारण्यात येणार होत्या. मात्र चौकशीसाठी प्रवाशांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास काही प्रतिसादच दिला जात नाही.   


प्रवाशांना आपत्कालीन वेळी तातडीने मदत मिळावी तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी तातडीने कॉल सेंटरला माहिती कळवण्याबाबत बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे कॉल सेंटरमध्ये प्रतिसाद मिळत नसल्याचीच बाब समोर आली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांनाही अडचण निर्माण झाली आहे. मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या या काॅल सेंटरबाबत प्रवाशांसह कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या अाहेत. तक्रारींची तातडीने अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. कॉल सेंटरबाबत तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी प्रवाशी करत आहेत. 

 

कॉल सेंटरकडून काही प्रतिसादच मिळत नाही  
बसेसच्या वेळापत्रकाबाबत चौकशीसाठी कॉल सेंटरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोल फ्री क्रमांकाद्वारे प्रतिसादच मिळत नसल्याने या कॉल सेंटरचा उपयोगच होत नाही.  
गौरव पगारे, प्रवासी

बातम्या आणखी आहेत...