आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा-कोरेगाव दोषींवर कारवाई करा; राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भीमा-कोरेगाव घटनेतील दोषी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांच्यावर कुठलिही कारवाई न करणाऱ्या, त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यासह, या घटनेतील आंबेडकरी अनुयायांवर दाखल गुन्हे रद्द करुन पोलिसांनी सुरू केलेले कोम्बिंग ऑपरेशन बंद करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 


भीमा-कोरेगाव घटनेत लहान मुलांसह महिलाही मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्या होत्या. परंतु याची कोणतीही दखल न घेता शासनाने उलटपक्षी विविध राज्यांतून, तसेच महाराष्ट्रभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांवरच गुन्हे दाखल केले. पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्येही आंबेडकरी अनुयायांचीच धरपकड सुरू आहे, असा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिना उलटूनही शासनाने यातील दोषींवर कारवाई न करता एकतर्फीच कारवाई केली जात आहे. हा प्रकार म्हणजे आंबेडकरी जनतेवर अन्याय असल्याचा आरोप करत त्यांनी शासनाचा निषेध केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात भीमा-कोरेगाव हल्ला व दंगलीतील प्रमुख सुत्रधार संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना त्वरीत गजाआड करुन संघटीत गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) कारवाई व्हावी. कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे त्वरीत रद्द करावे. जेलमध्ये डांबून ठेवलेल्या कार्यकर्त्यांची त्वरीत सुटका करावी. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल समन्वय समितीने सादर केला आहे. त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी. कर्तव्यात कसूर केलेल्या या हल्ल्याच्या आणि घटनेतील जबाबदार पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांंवर बडतर्फीची कारवाई करत जेलमध्ये टाकावे. यात नुकसान झालेल्या वाहनांचे शासनाने त्वरीत नुकसान भरपाई करावी. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, बाळासाहेब साळवे, शेख अख्तर, जितेंद्र जगताप, मंगेश जगताप, सय्यद मोहम्मद, जितू बागूल, सचिन भुजबळ, विकी पवार, रोहीत दोंदे, शुभम पगारे, जय देवगावकर, मनोहर दोंदे, सनी पगारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...