आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप अामदाराच्या अंगरक्षकाने रिव्हाॅल्व्हर राेखल्याचा अाराेप; अपघातानंतर वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या भाजप अामदार सीमा हिरे यांच्या कारला शुक्रवारी सकाळी कसाऱ्याजवळ दुसऱ्या कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुदैवाने काेणीही जखमी झाले नाही. मात्र हिरे यांच्या अंगरक्षकाने अापल्याला मारहाण करून पिस्तूल राेखून जिवे मारण्याची धमकी दिली, असा अाराेप संबंधित कारचालकाने केला अाहे. तसेच त्यांच्यावर कारवाईसाठी कसारा पाेलिस ठाण्याला घेरावही घातला. दरम्यान, अामदार हिरे व अंगरक्षकाने मात्र हे अाराेप फेटाळले.   


‘ज्या तवेरा गाडीने हिरे यांच्या कारला धडक दिली. त्यांनी अाधीही दाेनदा कट मारलेला हाेता. अपघातानंतर त्या तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. अंगरक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या तरुणांनी मारण्यासाठी क्रिकेटच्या बॅट उगारल्या. मात्र तरीही अामदारांनी त्यांच्याविराेधात तक्रारी दिल्या नाहीत’, असे भाजयुमाेचे राज्य प्रदेश सचिव महेश श्रीश्रीमाळ यांनी म्हटले अाहे.     


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी अामदार सीमा हिरे या सकाळी नऊच्या सुमारास मुंबईकडे जात असताना कसारा फाटा परिसरात पाठीमागून येणारी तवेरा गाडी त्यांच्या कारवर धडकली. हिरे यांच्या चालकाने वेग कमी केल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र हिरे यांच्या अंगरक्षकांनी गाडी थांबवून तवेरातील सुनील किर्वे व शनो फाळके यांना मारहाण केल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला. या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी कसारा बायपासला धाव घेतली. जमाव येत असल्याची  कुणकुण लागताच आमदार हिरे यांनी कसारा पोलिस ठाणे गाठले. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कसारा पोलिस ठाण्यास घेराव घातला.  तरुणांच्या बाजूने  नातेवाईक व नागरिकांनी कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कोल्हे यांच्याकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, इगतपुरीतील भाजपच्या नेत्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले.  त्यामुळे पाेलिसात तक्रार दाखल हाेऊ शकली नाही.  

 

काेणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये  
शुक्रवारी सकाळपासून माझ्या गाडीचा अपघात झाला असे वृत्त साेशल मीडियावर येत हाेते. मी मुंबई येथे मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या परिषदेस भेट देण्यासाठी जात असताना माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला होता, कोणालाही इजा झाली नाही. याबाबत पसरविण्यात येणाऱ्या काेणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.  
- सीमा महेश हिरे, आमदार

बातम्या आणखी आहेत...