आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वा.सावरकरांच्या अभिनव भारत मंदिराचे ऐतिहासिक स्मारक होणार;आ.फरांदे यांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्वातंत्र्यप्राप्तीनंतर क्रांतीची नाही, तर विधायक कामाची गरज आहे, या भूमिकेतून १९५३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराच्या स्थळी ऐतिहासिक स्मारक उभारण्यात येणार आहे. तीळ भांडेश्वर लेनमधील ही वास्तू शासनाच्या ताब्यात घेऊन त्याचे आधुनिक स्मारक विकसित करण्यासाठी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेतला असून ट्रस्टच्या विश्वस्तांनीही यास हिरवा कंदील दाखवला आहे.  


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये पुण्यात “अभिनव भारत’ची सांगता केली आणि त्यानंतर १९५३ मध्ये नाशिकमधील विश्वंभरांचा वाडा विकत घेऊन त्या ठिकाणी अभिनव भारत मंदिराची स्थापना केली. वाड्यातील वरील कक्षास बाबा सावरकरांचे, तर खालील कक्षांना देशपांडे, कर्वे आणि कान्हेरेंची नावे दिली. क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ वाड्यात एक तुळशी वृंदावन बांधले. या ठिकाणी ग्रंथालय, विज्ञान आणि क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे, अशी सावरकरांची भूमिका असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.  स्मारकाचे जतन व सावरकर चळवळीतील क्रांतिकारकांच्या कुटुंबांचे गौरव फलक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले असल्याचे अामदार देवयानी फरांदे म्हणाल्या.