आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्र विक्री करणाऱ्या दोघांकडून पाच गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तब्बल २२ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अंबड पोलिसांनी सिडकोमधील कारगिल चौकात तर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकराेडला सत्कार पॉइंट येथे ही धडक कारवाई केली. दोघे सराईत गुन्हेगार असून शहरातील टोळ्यांच्या संपर्कात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथक सिडको परिसरात गस्त घालत असताना एक संशयित महिंद्रा कारमध्ये पिस्तूल विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कारगिल चौकात सापळा रचला. एक संशयित महिंद्रा कंपनीच्या एक्सयूव्ही कारमध्ये बसलेला आढळला. त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मनोज मच्छिंद्र शार्दूल (२५, रा. दत्तनगर, चुंचाळे, अंबड) असे नाव त्याने सांगितले. अंगझडतीमध्ये काही आढळले नाही. मात्र, पथकाने कारची झडती घेतली असता काडतूस असलेले पिस्तूल तसेच चाकू, कोयता अाढळून आला.
पथकाने त्याच्या घराकडे मोर्चा वळवला असता घरझडतीमध्ये आणखी दोन गावठी पिस्तूल अाढळून आले. यामध्येही काडतूस लोड असल्याचे अाढळले. संशयित मूळ धुळ्यातील आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी धुळे, अंबड पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टखाली दोन गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक तुषार चव्हाण, दत्तात्रेय गवारे, अवी देवरे, विजय वरंदळ, दुश्यंत जोपळे, हेमंत आहिरे, दीपक वाणी, भास्कर मल्ले, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, विपुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताची चौकशी सुरू आहे. कारवाईत कार, पिस्तूल असा १२ लाख २० हजारांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.