आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन मित्रांचा उपचारादरम्यान मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन जिवलग मित्रांचा मंगळवारी (दि. २४) एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. २०) मुंबई-आग्रारोडवरील टोयोटा शोरूमसमोर अज्ञात वाहनाने कारला धडक दिली होती. या अपघातात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. दोघांवर उपचार सुरू असताना मृत्यूने त्यांना गाठले. अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुशील खिंवसरा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पुतण्या कुणाल भरत खिंवसरा (२२) आणि त्याचा मित्र सुश्रुत नयन पाटील (२२) हे वर्णा कारने (एमएच १५ डीएम १६११) पाथर्डी फाट्याकडे जात असताना एका अज्ञात वाहनाने कारला ओव्हरटेक करत असताना भरधाव धडक दिली. यामध्ये कारमधील दोघांना गंभीर मार लागला. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोघांना गंभीर जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी काही वेळाच्या अंतराने दाेघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खिंवसरा आणि पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली अाहे. कुणाल खिंवसरा याचे वडील उद्योजक आहेत. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील व लहान भाऊ असा मोठा परिवार आहे. त्याने नुकतेच सीएचे शिक्षण पूर्ण केले होते. कुणाल हा उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू होता. सुश्रुत हादेखील सीए शिक्षण घेत होता. त्याचे वडील कृषी खात्यात नोकरीस आहेत. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. 
 

शालेय जीवनापासूनच जिवलग मित्र 
कुणाल आणि सुश्रुत दोघांनी शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत एकत्र शिक्षण घेतले हाेते. दाेघेही सीए करत होते. कुठल्याही कार्यक्रमास तसेच खेळामध्ये दोघे सोबतच रहात असत. कारमध्येही दोघे सोबत होते. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...