आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी तरुण अचानक अस्वस्थ; डाॅक्टरांनी वाचवले प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबई येथे रविवारी झालेल्या टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी तरुण अचानक अस्वस्थ हाेऊन  जमिनीवर काेसळला. हे दृश्य बघताच नाशिकच्या तीन डाॅक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित रुग्णवाहिकेत नेऊन उपचार करत त्याचे प्राण वाचवले. डाॅ. वैभव पाटील, डाॅ. प्रशांत देवरे अाणि डाॅ. श्रीकांत उपासनी यांनी त्याला जीवनदान दिले.


मुंबई मॅरेथाॅनमध्ये नाशिकमधील शंभरहून अधिक डाॅक्टर व इतर स्पर्धक सहभागी झाले हाेते. सकाळी २१ किलाेमीटरची मॅरेथाॅन पूर्ण करून नाशिकचे डाॅक्टर विश्रांती घेत मैदानावर बसले हाेते. इतरही स्पर्धक त्यांच्या बाजूला हाेते. त्याच वेळी एक तरुण अचानक भाेवळ येऊन पडला. हे बघताच डाॅ. वैभव पाटील, डाॅ. देवरे आणि डाॅ. उपासनी यांनी तत्काळ अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या या तरुणाचे हृदयाचे ठाेके, श्वासोच्छ््वास बघता त्यात अनियमितता  अाढळून अाली. वेळ न दवडता तातडीने रुग्णवाहिका बाेलावून त्यात बेशुद्ध अवस्थेतील तरुणाला ठेवत तिघा डाॅक्टरांनी उपचार सुरू केले. तरुणाचा श्वासोच्छ्वास बंद होत होता. 


रुग्णवाहिकेत डाॅक्टरांनी सीपीआर (कार्डियो पल्मनरी रेसुस्किटेशन) सुरू केले. छातीवर दाब देऊन हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. एकाने रुग्णाचे पाय चाेळत, तर दुसऱ्याने मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सीपीआर चालू ठेवतच वैद्यकीय कक्षात रुग्णाला नेण्यात आले. डाॅ. देवरे यांनी श्वासनलिकेत नळी टाकली आणि डाॅ. श्रीकांत उपासनी यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केले. परंतु रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद होत होते. तेव्हा दोन कृत्रिम शाॅक देण्यात आले. जवळपास पंधरा मिनिटे तिन्ही डाॅक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनतर अखेरीस रुग्णाचे ठाेके नियमित झाले, त्याचे प्राण वाचले. 


अायएमए करणार तिघांचा गाैरव   
डाॅ. देवरे, डाॅ. पाटील, डाॅ. उपासनी यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य झाले. त्यांच्यासाेबत संयाेजकांनी तातडीने रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, यंत्रसामग्री उपलब्ध करून दिल्याने डाॅक्टरांनी त्यांचेही अाभार मानले. या घटनेतून तीन डाॅक्टरांनी रुग्णसेवेत एक अादर्श घालून दिल्याने त्यांचा नाशिक अायएमएच्या वतीने लवकरच गाैरव करण्यात येणार अाहे.