आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे भरावे लागताहेत 'ऑफलाइन' अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ऑनलाइन शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा महाविद्यालयाने ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाविद्यालयांमध्ये हे अर्ज भरण्यासाठी रांगा लागत असून यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. राज्यातील १५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज पुन्हा ऑफलाइन पद्धतीने भरावे लागत असल्याने महाविद्यालयांवरही याचा ताण आल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून दिलेल्या मुदतीत सर्व विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे आव्हान महाविद्यालयासह समाजकल्याण विभागासमोर उभे राहिले आहे. 


राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता यावेत यासाठी महा डीबीटी हे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून त्याची एक प्रत महाविद्यालयातसुद्धा सादर केली होती. ऑनलाइन अर्ज करताना विविध कागदपत्रे स्कॅनिंग करून ती अपलोड करणे, अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेचा आधार घेणे, अर्ज भरल्यानंतर प्रिंट काढून महाविद्यालयांमध्ये सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना २०० ते २५० रुपये खर्च आला होता. परंतु, आता पुन्हा समाजकल्याण विभागाने विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज भरून घेण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यार्थ्यांनी भरून दिलेले ऑफलाइन अर्ज समाजकल्याण विभागात जमा केल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांकडून अर्ज जमा करण्यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न सुरू केले असले तरी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मनुष्यबळाच्या अभावी अडचणी येत आहेत.

 
'ऑफलाइन' अर्ज भरताना अार्थिक फटका 
शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाइन भरण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना सुद्धा फटका बसला आहे. शिष्यवृत्ती अर्जासोबत जोडण्यासाठी पुन्हा उत्पन्न दाखला, नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र, जातीचा दाखला अशा कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू अाहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 


बँकेचा शिक्का बंधनकारक 
ऑफलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना बँक खात्याला आधार लिंक करून बँकेकडून आधार लिंक केल्याबाबतचा शिक्का फॉर्मवर घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले अाहे. बँकेचा शिक्का नसल्यास शिष्यवृत्तीचा अर्ज जमा करून घेतला जात नाही. शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून त्यापैकी अनेकांचे बँक खाते गावाकडील बँकेत असल्याने त्यांना आधार लिंकिंग फॉर्म आणण्यासाठी बँकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. 


प्रतिज्ञापत्राची सक्ती सुरूच 
मागासवर्गीय, भटके विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून घेण्यास राज्य सरकारने महाविद्यालयांना नकार दिलेला असतानाही जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांकडून प्रतिज्ञापत्राची सक्ती केली जात असल्याची तक्रारी समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...