आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावस्त्र पैठणीच्या निर्मितीसाठी झटतील 200 दिव्यांग; कापसे फाऊंडेशनचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दिव्यांगांमध्ये विशेषत: मूकबधिर व्यक्तींमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा जास्त असते हा गुण हेरुन कापसे फाउंडेशनने सुमारे २०० मूकबधिर तरुणांना हातमागावर पैठणी बनविण्याचे काैशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर संबंधितांना येवल्याजवळील वडगावला राहण्यासाठी फ्लॅटची व्यवस्था करण्यात अाली अाहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये हातमाग यंत्र देण्यात येणार असून त्यावर हातमाग कामगारांना चांगला राेजगार मिळणार अाहे.    


महाराष्ट्रातील पैठणी या भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकाराला मागणी चांगली असली तरी हा कला प्रकार टिकून राहण्यासाठी प्रशिक्षित कारागिरांची संख्या घटत अाहे. नवीन पिढी या क्षेत्रात उतरायला तयार नाही. परिणामत: पैठणीचे उत्पादन कमी हाेत अाहे. दुसरीकडे अाज असे असंख्य दिव्यांग अाहेत, ज्यांना गरज असूनही राेजगार मिळत नाही. अशांचा शाेध घेऊन विशेषत: मूकबधिर तरुणांची निवड करुन त्यांच्यात पैठणी बनविण्याचे काैशल्य कापसे फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत अाहे. प्रशिक्षण कालावधीत रहिवासापासून जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार अाहे. या प्रशिक्षणानंतर येवल्याजवळील वडगावला प्रत्येकाची राहण्याची व्यवस्था करण्यात अाली अाहे. सद्य:स्थितीत या ठिकाणी शंभर फ्लॅट बांधून तयार अाहेत. याच ठिकाणी प्रत्येकाला हातमाग देखील उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे. या फ्लॅटमध्ये कच्चा माल अाणून देण्यापासून तयार पैठणी घेऊन जाण्यापर्यंतची जबाबदारी फाउंडेशनच उचलणार अाहे. व्यवसायातून परमार्थ साधणाऱ्या या अनाेख्या याेजनेतून तरुणांना राेजगार तर मिळेलच, शिवाय त्यांच्यात अात्मविश्वास देखील वाढणार अाहे.    

 

हामगामावरील पैठणीची वैशिष्ट्ये 
यंत्रमागावर विणलेल्या साड्या जास्त टिकत नाहीत. उलट हातमागावरच्या साड्या वर्षांनुवर्षे टिकतात. अशी साडी तयार व्हायला २ महिने ते कधी १८ महिन्यांपर्यंतदेखील वेळ लागू शकतो. पैठणीतील बारीक नक्षीकाम बरेचा १२ तास काम करूनही फक्त ०.५० सेंटीमीटर ते ०.७५ सेंटीमीटर इतकेच होते. पैठणीचा पदरच साधारणपणे १० ते ३० इंचांचा असतो. यावरून साडी विणायला किती वेळ लागेल, याचा अंदाज येताे.   

 

१८ वर्षांपर्यंतची वयाेमर्यादा   
यापूर्वी अाम्ही मूकबधिर तरुणांकडून हातमागावर विनकाम करण्याचा प्रयाेग केला. त्यांना हे काम अतिशय चांगल्या पध्दतीने जमू शकते, याचा विश्वास अाम्हाला पटला. यातून संबंधितांना कायमस्वरुपी राेजगारही उपलब्ध हाेऊ शकताे. या प्रकल्पात काम करण्यासाठी इच्छुक दिव्यांगांचे वय किमान १८ वर्षांपुढील असावे.    
बाळकृष्ण कापसे, संचालक कापसे फाउंडेशन

 

महिन्याला १५ हजारांपर्यंत मिळणार उत्पन्न   

पैठणी बनविण्याचे काम अतिशय काैशल्याचे असते. एका कारागिराला महिन्याला सुमारे १२ ते १५ हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. शिवाय कारागीर जितके काम करतील तितके त्यांचे उत्पन्न वाढू शकते.    

बातम्या आणखी आहेत...