आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सर, क्रिकेटर हाेण्याचे स्वप्न बघत 3 मित्रांनी गाठली मुंबई; मात्र भांबावल्याने पुन्हा फिरले माघारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मायानगरी मुंबईत जाऊन एकाला बनायचे हाेते डान्सर, तर दोघांना क्रिकेटर.. माेठी स्वप्नं पाहणाऱ्या तीन शालेय मुलांनी सकाळी स्वप्ननगरी गाठली खरी, मात्र त्या महानगरीतील गजबज पाहून आणि कुटुंबीयांच्या आठवणीने व्याकुळ झालेले हे तिघे मित्र रात्री उशिरा घरी परतले. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि कुटुंबीयांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. बुधवारी (दि. १४) सकाळी ८ वाजता शहरातील एका शाळेतून ही मुले निघून गेली होती.

 

सकाळी ८ वाजता तिघे शाळेत आले. बॅगमध्येच कपडे आणले होते. एकजण भावासोबत शाळेत आला. भावाला त्याच्या वर्गात जाऊ दिल्यानंतर ताे शाळेतून पलायन करत टिळकवाडी सिग्नलपर्यंत आला. येथे दोन मित्र उभे होते. तिघांनी आणलेले कपडे बदलले. रिक्षाने रविवार कारंजावर व बसने नाशिकराेड रेल्वेस्थानकावर गेले. येथून रेल्वेमध्ये बसून दादर गाठले. एकाने घरातून ३ हजार ७०० रुपये सोबत आणले होते. या पैशातून हॉटेलमध्ये जेवण केले. मात्र, जेवताना कुटुंबीयांची आठवण येत असल्याचे तिघांनी एकमेकांना बोलून दाखवले. निघताना एकाने मोबाइलचे सीमकार्ड फेकून दिले हाेते. तर दुसऱ्याकडे मोबाइल होता. त्याने आईवडिलांना फोन न करता एका नातेवाइकाला फोन केला मात्र अनोळखी नंबर असल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


अखेर तिघांनी विचार केल्यानंतर दादर बसस्थानकावर काही नागरिकांच्या मदतीने नाशिकला जाणारी लक्झरी बस गाठली. तेथून बसने ते रात्री १२ वाजता द्वारका सर्कलवर अाले. एक मुलगा टिळकवाडी येथे घरी परत आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी दोघांच्या कुटुंबियांना फाेन करून ही माहिती दिली. तोपर्यंत सरकारवाडा पोलिसांनी दोघांना द्वारका येथून ताब्यात घेत आनंदवल्ली आणि शरणपुरोड परिसरात राहणाऱ्या पालकांच्या ताब्यात दिले. तीघांपैकी एकाचे वडील कंपनीत, दुसऱ्याचे वडील सुरक्षारक्षक तर तिसऱ्याचे वडील मजुरी करातात. तीन मुले सुखरुप घरी परत आल्याने शाळा व्यवस्थापनेला कळवण्यात आले. व्यवस्थापाने पोलिसांना पत्र देत अभिनंदन केले. सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या पथकाने शोधार्थ विशेष परिश्रम घेतले.

 

बातम्या आणखी आहेत...